ठाणे – वीस ते पंचवीस वर्षांपुर्वी ठाणे खूप वेगळे होते. निसर्गाच्या सानिध्यात राहता-राहता आता निसर्गच राहिलेला नाही. सध्या मिळेल त्या जागी बांध इमारत असे प्रकार सुरू असून याचा कुठेतरी विचार व्हायला हवा, असे सांगत आपले ठाणे आपणच जपले पाहिजे, असे मत अभिनेता संतोष जुवेकर यांनी व्यक्त केले. नवीन ठाणे मला नक्की हवे आहे पण, ते शिस्तबद्द आणि छान असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी सायंकाळी झाले. यावेळी अभिनेता संतोष जुवेकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठाण्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत बदलत्या ठाण्यावर भाष्य केले.
काळानुसार बदल हा होतच असतो. कोणी ठरवू किंवा नाही, काळ हा बदलतो. तशा सर्वच गोष्टी बदलत असतात आणि माणसेही बदलत असतात. २० ते २५ वर्षांपूर्वी ठाणे खूप वेगळे होते. त्यावेळी घोडबंदर, कोलशेत, ढोकाळीच्या पुढे गेल्यानंतर दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास थंडी जाणवायची. परंतु आज ठाणे विस्तारलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहायला या, निसर्गात राहणे उत्तम आहे, असे सांगितले जाते. परंतु निसर्गाच्या सानिध्यात रहायला या, असे बोलून आता तिथे टॉवर झाले आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात राहता -राहता निसर्गच राहिलेले नाही, अशी टिप्पणीही जुवेकर यांनी यावेळी केली.
बरेच लोक म्हणतात की, आमच्या इमारतीत वाघ आला होता. खरतर तुमच्या इमारतीत वाघ आला नव्हता, उलट तुम्ही तिकडे गेले आहेत. कारण वाघाचे ते घर आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. शहराची प्रगती होणे, हे चांगले आहे. प्रगतीबरोबर बदल होणारच पण, एखादी चांगली गोष्ट प्रमाणाच्या बाहेर जर गेली तर, ती सुद्धा वाईट होते. जसे वाईट गोष्टींचा अतिरेक झाला तर नुकसान होते, तसेच अती चांगलेपणा जरी केला, तरीही नुकसानच होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध असायला हवी, असेही ते म्हणाले.
सध्या मिळेल त्या जागी बांध इमारत असे प्रकार सुरू आहेत. परंतु या गोष्टीचा विचार करायला हवा. निसर्गाच्या सानिध्यात राहायला या म्हणता म्हणता निसर्ग तिथे राहत नाहीये, याची काळजी घ्यायला हवी असे ते म्हणाले. ठाण्यात ३७ तलाव आहेत. ठाणे हे महाराष्ट्रात असे एकमेव शहर आहे की, जिथे एवढे तलाव आहेत. प्राचीन कौपिनेश्वर मंदिर आहे. आपण ज्याला ठाणे कारागृह म्हणतो, ते कारागृह नाहीतर तो वाडा आहे. अशा अनेक गोष्टी ठाण्यात आहेत. ठाणे हे आपले आहे आणि आपल्या ठाण्याला आपणच जपले पाहिजे. तसेच वाहनांबाबतीतही नियम आखले गेले पाहिजेत, असे सांगत नवीन ठाणे मला नक्की हवे आहे पण, ते शिस्तबद्ध आणि छान असायला हवे. ठाण्यात कशाची कमी नाही, खाण्यापिण्याची रेलचेल आहे, फक्त हे सर्व टिकून ठेवायला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
माझा फोटो त्या पेपर मध्ये येतो
मी शाळेत महाविद्यालयात असताना पेपर टाकायचो, तेव्हा त्यामध्ये लोकसत्ता पेपर असायचा. पहाटे ४: ३० च्या सुमारास पेपर घेऊन आम्ही मित्र सायकल वरून पेपर टाकायला जायचो. आज देवाच्या कृपेने लोकसत्ता अजूनही आहे आणि कायम राहिल. पण मी आता पेपर टाकत नाही. परंतु माझा फोटो त्या पेपर मध्ये येतो, असे सांगत जुवेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.