ठाणे : प्रारब्धापेक्षा माझा कर्मावर अधिक विश्वास आहे. अभिनेत्याला अभिनयाचे भान असावे, त्याने वाहवत जाऊ नये, असे मत अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी व्यक्त केले. ‘चतुरंग’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक कलाकार एक संध्याकाळ या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. डोंबिवलीतील स. वा. जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

लेखन करतानाच वाचन आणि संशोधन करायलाच हवे. संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. परंतु आवडीचे क्षेत्र सोडू नका. तुम्ही नक्की काय करायला हवे हे तुम्हाला तुमचे मनच सांगू शकते. मनाने केलेला निर्धार हा कायम महत्त्वाचा असतो. आईला संस्कृत भाषा अवगत होती, त्यामुळे स्पष्ट बोलण्याचे प्रशिक्षण घरातच मिळाले. आजुबाजूला भाषेची कितीही सरमिसळ असली तरी माझे बोलणे स्पष्ट होते. चौथीच्या वर्गात असताना ‘जी महाराज’ असे नाटकातील पहिले वाक्य उच्चारून नाटय़ क्षेत्राशी ओळख झाली. दादरच्या कीर्ती महाविद्यालयात शिकताना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाबद्दल माहिती मिळाली. संगीत कुलकर्णी, कुमार सोहोनी आणि दिग्पाल लांजेकर यांच्या भेटीचे क्षण हे सर्वाधिक आनंदाचे होते, असे चिन्मय मांडलेकर यांनी सांगितले. पु. ल. देशपांडे हे लेखनातील आदर्श आहेत असेही ते म्हणाले. यावेळी मदन जोशी यांच्या हस्ते चिन्मय मांडलेकर यांचा सत्कार करण्यात आला तर डॉ. सुनील पुणतांबेकर यांच्या हस्ते सन्मानिचन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले.

Story img Loader