डोंबिवली : ‘लोकसत्ता ९९९ नवरात्री, नवरंग आणि नवभक्ती’ या उपक्रमाच्या सहाव्या दिवशीचा सोहळा डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी अंबिकानगरमधील शितलादेवी मंदिराच्या प्रांगणात शनिवारी शिवनेरी मित्र मंडळाच्या सहकार्याने उत्साहात पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर हिच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साहाला उधाण आले. नृत्य कलाकार ऋग्वेद बोंद्रे आणि सहकलाकारांनी देवीचा जागर, कोळी गीते सादर करत उपस्थितांना ठेका धरण्यास लावले. मंगळागौरीची गाणी, नृत्य, फुगडय़ा खेळून ‘संस्कृती कला मंच’च्या महिलांनी परंपरेला उजाळा दिला.
‘राम बंधू मसाले’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’ हा उपक्रम संस्मरणीय व्हावा यासाठी शिवनेरी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. देवीचा जागर झाल्यानंतर निवेदक कुणाल रेगे, रुपाली वीरकर यांनी स्पर्धकांना खुलविले. उखाणे, झटपट वाक्य, जोडी तुझी माझी, आदेश दिलेल्या वस्तू टोपलीत झटपट आणून ठेवणे, कमी वेळात अधिक फुगे फुगविणे, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सेल्फी स्पर्धा घेतल्या. त्या जिंकण्यासाठी स्पर्धकांची सुरू असलेली धडपड पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. यशस्वी स्पर्धकांना ‘राम बंधू मसाले’ उत्पादित वस्तूंची भेट देण्यात आली. पाककला स्पर्धेतील सहभागी महिलांनी मूगडाळीचा चिवडा, भाजणीच्या चकल्या, बाजरीच्या सांडग्यांचा चिवडा, पौष्टिक चिवडा असे स्वादिष्ट जिन्नस तयार केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री आदित्य सारंगधर, ‘इन्फ्राटेक’च्या मेनका राठोड यांनी पाक कला स्पर्धेचे निरीक्षण, परीक्षण केले.
पाककलेतील यशस्वी स्पर्धकांना ‘राम बंधू मसाले’च्या वतीने बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेतील यशस्वी दाम्पत्याला एम. के. घारे ज्वेलर्स प्रस्तुत ठुशी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. नृत्य, गाण्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनाबद्दल या वेळी ‘लोकसत्ता’तर्फे शिवनेरी मित्र मंडळाला ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश देण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हा धनादेश स्वीकारला. या वेळी ‘राम बंधू मसाला’चे महाव्यवस्थापक जगदीश गुप्ता, ‘इन्फ्राटेक’च्या मेनका राठोड उपस्थित होते.
आज भायखळय़ात ‘लोकसत्ता ९९९’
‘लोकसत्ता ९९९’ उपक्रमांतर्गत आठवा कार्यक्रम सोमवारी, ३ ऑक्टोबरला भायखळा पश्चिमेकडील ना. म. जोशी मार्ग, बकरी अड्डा परिसरात तुकाराम कुऱ्हाडे चाळ येथील सार्वजनिक उत्सव मंडळात होणार आहे. संध्याकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतील जोडी अक्षय म्हणजेच शशांक केतकर आणि रमा म्हणजे शिवानी मुंढेकर उपस्थित राहणार आहेत.
मुख्य प्रायोजक : * राम बंधू मसाले
सहप्रायोजक : * महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ * सिडको * युनियन बँक ऑफ इंडिया
पॉवर्ड बाय : * इन्फ्राटेक * एम के घारे ज्वेलर्स
पाक कला स्पर्धा विजेते
प्रथम क्रमांक : वंदना वैद्य
द्वितीय क्रमांक : मोनिका संगवई
तृतीय क्रमांक : शीतल खडके
उत्तेजनार्थ : काजल ठक्कर