ठाणे : ठाण्यात काही नागरिकांच्या शिधापत्रिकेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्या तातडीने महिन्याभरात मार्गी लावा. तसेच प्रत्येक क्षेत्रात शिधावाटप विभागाच्या शिबिरांचे आयोजन करा, असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा – ठाणे स्थानकाच्या फलाट सात ते दहावरील मुंबई दिशेकडील पादचारी पुल दोन दिवसांपासून बंद
हेही वाचा – कल्याण-डोंबिवली महापालिकेची गतिमान ई ऑफिस प्रणाली संथगतीने
आमदार संजय केळकर यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहात शिधापत्रिका संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिधावाटप अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. अनेक भागांत नागरिकांची शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे समोर आले. तर काही ठिकाणी नागरिकांना ठरवून दिलेला शिधा मिळत नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार संजय केळकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना शिधापत्रिका दुरुस्तीसाठी शहरात शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या. १९९८ चे निकष बदलण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.