मुले मोठी होऊन जोपर्यंत त्यांच्या पायावर उभी राहत नाहीत, तोपर्यंत पालकांची जबाबदारी संपत नाही. नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावर होऊन ती आपापल्या मार्गी लागल्यानंतरच पालकांचे संगोपनपर्व संपते. मात्र ज्यांच्या पदरी विशेष मुले-मुली असतात, त्यांची जबाबदारी कधीच संपत नाही. कारण वयाने आणि शरीराने वाढ होत असली तरी विशेष मुले स्वतंत्रपणे स्वत:ची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यांना कायम देखभालीची आवश्यकता असते. बरोबरीची भावंडे, समवयस्क मुले-मुली मोठी होतात. मात्र त्यांच्यातील मूलपण कायम राहते. अशा कधीच मोठय़ा होऊ न शकणाऱ्या मुलांच्या काळजीने त्यांचे पालक सदैव त्रस्त असतात. आपण हयात असेपर्यंत त्यांची देखभाल करू, पण नंतर त्यांची कोण काळजी घेणार असा प्रश्न त्यांच्या मनाला सतत सतावत असतो. अशाच एका त्रस्त पालकाने आपल्या पोटच्या विशेष मुलाचा जीव घेतला. ती बातमी वाचून सुन्न झालेल्या माधव गोरे या ठाण्यातील एका सेवानिवृत्ताने विशेष मुलांसाठी पालक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बदलापूरजवळील मुळगांव येथे सहा एकर जागा घेतली आणि १९९४ मध्ये ‘आधार’ सुरू झाले. गेली २२ वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या या ‘आधार’ निवासी केंद्रात २०० विशेष मुले-मुली आनंदाने राहत आहेत. चार वर्षांपूर्वी नाशिक येथे ‘आधार’ची दुसरी शाखा कार्यान्वित झाली. तिथेही शंभरजण आहेत. अशा प्रकारे ३०० विशेष मुलांचा कायमस्वरूपी सांभाळ करणारी ‘आधार’ ही देशातील सर्वात मोठी पालक संघटना आहे.
या मुलांची अहोरात्र देखभाल करण्यासाठी २०० पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत. पालकांतर्फे मिळणाऱ्या मासिक शुल्कातून या संस्थेचा कारभार चालतो. अर्थात त्यातून भागत नाही. समाजातील संवेदनशील मनाची माणसे दरवर्षी यथाशक्ती निरनिराळ्या निमित्ताने संस्थेला देणगी देत असतात. गेल्या काही वर्षांपासून काही कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या ‘सीएसआर’ योजनेतून संस्थेच्या योजनांमध्ये मदत करतात. त्यातून संस्थेचा गाडा चालतो. याव्यतिरिक्त शासनातर्फे कोणतेही अनुदान अथवा मदत संस्थेला मिळत नाही. मात्र दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या वतीने विशेष मुलांच्या वसतिगृहासाठी दिला जाणारा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘आधार’ संस्थेला देण्यात आला. त्यामुळे देशभर संस्थेची कीर्ती पोहोचली. दरम्यानच्या काळात माधव गोरे यांचे निधन झाले. ‘आपल्यानंतर या मुलांचे काय होईल’ अशी चिंता मनी वाहणारे २०० पैकी ८८ पालकही निवर्तले. मात्र निधनापूर्वी आपला मुलगा किंवा मुलगी ‘आधार’मध्ये सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहे, हे त्यांनी ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले होते. सध्या विश्वास गोरे संस्थेचे व्यवस्थापन पाहतात.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ संस्था विशेष मुलांचा ‘आधार’ बनली आहे. इथे त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. ‘आधार’चा स्वतंत्र आरोग्य कक्ष आहे. तिथे पाच परिचारिका तसेच वैद्यकीय समाजसेवक पूर्णवेळ कार्यरत आहे. डॉक्टरांची नियमित भेट असते. विभिन्न वयोगटातील, निरनिराळ्या स्थितीतील विशेष मुले-मुली इथे राहतात. ‘एम्टी माइंड इज डेव्हिील्स वर्कशॉप्स’ ही वस्तुस्थिती असल्याने या मुलांना सतत कार्यरत ठेवले जाते. त्यासाठी संस्थेच्या दोन्ही वसतिगृहांमध्ये व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहेत. तिथे प्रत्येकाला आवड, क्षमता आणि गरजेनुसार काम दिले जाते. मेणबत्ती बनविणे, उदबत्ती प्रशिक्षण, फुलदाणी, कागदी पिशव्या, निरनिराळ्या प्रकारचे मसाले ‘आधार’मध्ये बनविले जातात. विविध प्रदर्शनांमधून ‘आधार’मधील मुलांनी बनविलेल्या या वस्तूंची विक्री केली जाते. मुलांच्या नियमितपणे सहली आयोजित केल्या जातात. निरनिराळ्या स्पर्धामधून ‘आधार’ची मुले-मुली सहभागी होतात. सर्वसाधारण मुलांच्या शाळेला दिवाळी, तसेच उन्हाळ्याची सुट्टी असते. ‘आधार’ मात्र बाराही महिने सुरू असते. एकही दिवस या सेवेत खंड पडलेला नाही. काही मुलांचे पालक त्यांना गणपती, दिवाळी तसेच उन्हाळी सुट्टीत घरी नेतात. त्यांचे लाड करण्याची हौस भागवितात. मात्र ‘आधार’च्या वातावरणाची सवय झालेली मुले घरी फार दिवस राहत नाहीत. कारण या विश्वात ते आता रमून गेले आहेत.
‘आधार’चा पसारा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र ३०० विशेष मुले-मुली आणि २०० कर्मचारी असे ५०० जणांचे कुटुंब सांभाळताना फार मोठी कसरत करावी लागत असल्याचे विश्वास गोरे सांगतात. पालकांकडून मिळणारे शुल्क आणि एकूण खर्च यात वर्षभरात साधारणत: एक कोटी रुपयांची तूट येते. समाजातील दानशूर देत असलेल्या देणग्या आणि कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून मिळणाऱ्या निधीतून ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न आधार व्यवस्थापन करते. समाजातील याच चांगुलपणाच्या, भलेपणाच्या भांडवलावर संस्था भविष्यातही विशेष मुलांची उत्तम देखभाल करेल, असा विश्वास विश्वास गोरे यांनी व्यक्त केला आहे.
संपर्क- ९८२१०५४३६९.