आठवडय़ाची मुलाखत – डॉ. नितीन बावस्कर
क्रिकेट या खेळालकल्याण पश्चिमेतील आधारवाडी कचराभूमीची कचरा साठवणुकीची क्षमता गेल्या दहा वर्षांपूर्वी संपली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कल्याण डोंबिवली पालिकेला ही कचराभूमी बंद करावी म्हणून नोटीस पाठविली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी एक जनहित याचिका दाखल आहे. कचराभूमी बंद केल्यास कचऱ्याच्या विल्हेवाटीचे काय करायचे, या प्रश्नावर सातत्याने चर्चा होत असताना या कचराभूमीमुळे आधारवाडी परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न दुर्लक्षित होत आहे. या पाश्र्वभूमीवर या परिसरात गेल्या २७ वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. नितीन बावस्कर यांच्याशी केलेली बातचीत..
आधारवाडीच्या कचराभूमीची अवस्था कशी आहे?
आधारवाडी कचराभूमी ही कल्याण नगरपालिका काळात शहराच्या वेशीवर होती. त्यामुळे या कचराभूमीवर टाकण्यात येणारा कचरा नियमित शहरवासीयांच्या नजरेत येत नव्हता. आता नागरीकरण झाले आहे. वस्ती कचराभूमीच्या काठावर पोहोचली आहे. घरांच्या वाढत्या गरजेमुळे आपण कोठे राहतो, याचा विचार न करता काही रहिवासी या भागात घर घेत आहेत. पंधरा ते वीस वर्षांपासून दुर्गाडी किल्ला, आधारवाडी, खाडीकिनारी भागात इमारती, बंगल्यांमध्ये राहणारे रहिवासी आपण मोकळ्या हवेत राहतो, या आनंदात होते. मागील पाच ते सहा वर्षांपासून हाच रहिवासी आता अस्वस्थ झाला आहे. आधारवाडी कचराभूमीवर गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून कचरा टाकण्यात येतो. हा कचरा आता पूर्णपणे कुजला आहे.
कचराभूमीमुळे नागरिकांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे?
पावसाळ्यात कचरा कुजतो. त्या कचऱ्यावर नव्याने शहरातील कचरा टाकण्यात येतो. पावसाळ्यात कचराभूमीवर जाण्यासाठी कचरावाहू वाहने कचराभूमीच्या आतील भागात नेण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु कचरावाहू वाहनांचे टायर तेथील चिखलात रुततात. तशा परिस्थितीत कचरावाहू वाहने कचराभूमीवर नेली जातात. त्यामुळे कचराभूमीच्या प्रवेशद्वारावरच कचरा, माती आणि पाणी यांचा चिखल तयार होतो. वाहनांच्या वर्दळीमुळे चाकांना चिखल लागून तो सर्वत्र पसरतो.
पावसाळय़ात या ठिकाणी पाणी साचते. त्यावर डास, मच्छर, कीटक पोसू लागतात. त्यांचा उपद्रव स्थानिकांना होतो. उन्हाळय़ाच्या दिवसात या कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यातून निर्माण होणारा धूर अतिशय घातक आहे. अनेकदा कचराभूमीवर टाकण्यात आलेल्या रासायानिक पदार्थामुळे प्रदूषण झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
या सर्वाचा रहिवाशांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
खोकला, श्वसनाचे विकार, त्वचारोग, सर्दी आणि जुलाब हे कचराभूमी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचे कायमस्वरूपी आजार आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना याचा सर्वाधिक त्रास होतो. धूर आणि दरुगधीमुळे वातावरणातील ऑक्सिजनची पातळी घसरते. त्याचा परिणाम शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण घटण्यावर होतो. त्यामुळे त्वचारोग बळावतो. डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार वाढतात. कचराभूमी परिसरातील अनेक रहिवासी दिवसभर नोकरी-व्यवसायानिमित्त शहराबाहेर असतात. त्यामुळे त्यांची या आजारातून सुटका होते. आधारवाडी कचराभूमीच्या बाजूला साठेनगर वस्तीमधील कचरावेचक, त्यांची मुले नेहमीच या आजारांनी बाधित असतात. दम्याचा विकार असलेले रुग्ण धुरामुळे सतत आजारी पडतात.
या परिसरातील वैद्यकीय सेवा देताना आलेले अनुभव..
२६ जुलैच्या महापुराने कल्याण शहराची उलटापालट करून टाकली. त्यानंतर या शहरात जी रोगराई वाढत गेली, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात कचराभूमीवरचा कचरा हे एक कारण आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहराचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचराभूमीवरची दरुगधी रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु दरुगधीच्या प्रमाणात हे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसते. दवाखान्यात दररोज येणाऱ्या रुग्णांमध्ये खोकला, सर्दीचा रुग्ण असतोच. कचराभूमीवरील धूर, धुलीकण, तेथील आरोग्याला हानीकारक घटक हवेत फिरत असल्याने त्याचा परिणाम सामान्यांच्या आरोग्यावर होत असतो.
यासाठी पालिकेने काय करायला हवे?
घनकचऱ्यासंदर्भात पालिकेच्या विरोधात उच्च, सर्वोच्च न्यायालयांत याचिका दाखल आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी पालिका प्रशासन घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत नाही, म्हणून उच्च न्यायालयाने पालिकेला नवीन बांधकामांना परवानगी देण्यास प्रतिबंध केला आहे. सहा महिन्यांत पालिकेने शहर परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, याची माहिती शहरवासीयांना द्यावी. यासाठी जनता दरबारसारखे कार्यक्रम आयोजित करावेत. प्रसिद्धीपत्रकांद्वारे पालिका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणते प्रकल्प हाती घेत आहे, याची माहिती रहिवाशांना द्यावी.
महापौर राजेंद्र देवळेकर हे अभ्यासू नगरसेवक आहेत. शहर परिसरातील नागरी समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळे त्यांनी एक दिवस फडके मैदान परिसरात लोकदरबारसारखा कार्यक्रम घेऊन पालिका आधारवाडी कचराभूमीबाबत काय निर्णय घेत आहे, याविषयी या भागातील रहिवाशांना मार्गदर्शन करावे. आयुक्त ई. रवींद्रन भारतीय प्रशासकीय सेवेतील आणि तडफदार अधिकारी पालिकेला लाभले आहेत. ते झटपट निर्णय घेत असल्याचा अनुभव शहरवासीय गेल्या सहा महिन्यांपासून घेत आहेत. पालिकेतील महापौर, आयुक्त या दोन्ही प्रतिनिधींना नगरसेवकांनी साथ दिली तर नक्कीच कचराभूमीचा प्रश्न निकाली निघेल.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न कसा सोडवता येईल?
आधारवाडी कचराभूमी बंद केली तर कचरा उंबर्डे येथील कचराभूमीवर टाकण्यात येणार आहे. पण तेथील रहिवाशांचा त्यास विरोध असल्याचे कळते. या वादात पडण्यापेक्षा पालिकेने टिटवाळा, कल्याण, डोंबिवली भागात विभागवार कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली तर कचरा, दरुगधीची समस्याच निर्माण होणार आहे. ज्या भागात कचरा तयार होतो त्या भागातच त्याचे विघटन करावे. यासाठी चांगले सल्लागार, कचरावेचक यांचे मार्गदर्शन घेतले हा प्रश्न सुटू शकतो. नवी मुंबईत हा प्रकल्प अमलात आणला जात आहे. सामान्यांना कचऱ्याचे महत्त्व पटवून दिले तर रहिवासी पालिकेला सहकार्य करण्यास तयार होतील. कचऱ्यापासून वीज, खतनिर्मिती करून त्याचा स्थानिक पातळीवर वापर सुरू केला तर लोक स्वत: हे प्रकल्प आमच्या भागात सुरू करा, हे सांगण्यासाठी पुढे येतील.
– भगवान मंडलिक