डोंबिवली : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेतील उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपस्थित युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करताना, आम्ही फक्त महाराष्ट्राचे हिताचे बोलत राहणार आहोत. हे बोललो नाही तर एक दिवस हे मुंबईतील मंत्रालय सुरतला नेतील, अशी टीका केली.
नकली शिवसेना, भटकती आत्मा, जाती, धर्माच्या विषयावर, पक्ष, नेते, पदाधिकारी फोडाफोडी त्यांना काय बोलायचे आहे, करायचे ते करू द्या. हे केले तरच त्यांना त्यांचे मार्ग समोर दिसणार आहेत, अन्यथा ते जागीच गोल फिरत राहणार आहेत. आम्ही मात्र महाराष्ट्र हित समोर ठेऊन बोलत राहणार आहोत, हे बोललो नाही तर एक दिवस हे मुंबईतील मंत्रालय सुरतला नेतील, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
भाजपचे पाऊल मागे पडतेय याची चाहूल त्यांना झाली की तात्काळ ते जात, धर्माचे विषय उकरून काढून त्यावर चर्चा घडवून आणण्यास, या विषयावर अराजक माजविण्यास सुरुवात करतात. त्यांनी काहीही केले तरी आम्ही त्यांच्या मागे ओढत जाणार नाहीत, आमचे लक्ष्य फक्त महाराष्ट्र हित एवढेच आहे, असे ते म्हणाले. कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीचा उमेदवार हा साधारण सामान्य उमेदवार आहे. एक महिला उमेदवार या मतदारसंघात लढत देत असल्याने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येथे जमला आहे, असे आदित्य यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील पदाधिकारी फोडले जात असले तरी हे काम राष्ट्रीय स्तरावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडी करत आहे. ईडी, सीबीआय या आता भाजपच्या शाखा आहेत, अशी टीका आदित्य यांनी केली.
राज्यातील अनेक विषयांवर जाहीरपणे आमच्याशी बोलायला या असे जाहीर आव्हान आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्याला कधी त्यांनी होकार दिला नाही. उलट काही चिंधीचोर आमच्या समोर पाठविले, असे आदित्य यांनी सांगितले.
हेही वाचा…कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद
आताची सगळी परिस्थिती पाहता निवडणूक आयोग नावाची यंत्रणा आहे की नाही, असा प्रश्न पडतो. त्यांनी डोळ्यावर झापडे का लावून ठेवली आहेत. लोकांना दिसतय ते आयोगाला का दिसत नाही, असे प्रश्न आदित्य यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे सोमवारी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा म्हणून केलेल्या टिकेवर आदित्य यांनी नाराजी व्यक्त करून ही टीका दुर्देवी असल्याचे सांगितले. हे बाहेरचे लोक आपल्या राज्यात येऊन आपल्याला नकली शिवसेना, भटकती आत्मा बोलतात. कोण आहेत हे लोक. या लोकांना आता जनता योग्य जागा दाखविल, अशा शब्दात आदित्य यांनी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले.