Aditya Thackeray on Badlapur Sexual Harassment Case : बदलापूरच्या आदर्श शाळेतील कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याच्या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मागच्या १० तासंपासून हजारो नागरिक रेल्वे स्टेशन तसेच आदर्श शाळेबाहेर आंदोलन करत आहेत. याप्रकरणातील दोषींना अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते आहे. या घटनेनंतर आता सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“आदित्य ठाकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. आम्ही दररोज महिलांसाठी सेल्फ डिफेन्सचे वर्ग सुरू करण्याचा विचार करतो आहे. पुढच्या काही दिवसांत असे वर्ग सुरूही होतील. पण दुर्दैवाने असे वर्ग सुरु करणे ही काळाची गरज बनली आहे. मुळात सुरक्षेची जबाबदारी महिलांवर का असावी? समाज आणि कायदा महिलांना सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही का?” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा – अखेर बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांना हटवले, तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग केला मोकळा

बलात्कार हा बलात्कार असतो

पुढे बोलताना, “देशभरातून रोज विनयभंग, बलात्काराच्या घटना ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे आपला संताप होतो. जलदगती न्यायालयात खटला चालवावा, पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे. बलात्कारासारखा अपराध सहन करता येणारा नाही, आज बदलापूर प्रकरणाबाबत ऐकून मन सून्न झालं आहे. खरं तर बलात्कार हा बलात्कार असतो, अशा प्रकरणात आरोपीच्या वयाचा विचार न करता त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Aditya Thackeray : “राज्यातलं सरकार महाराष्ट्रातून नाही, तर गुजरातमधून चालतं”, आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकारवर टीकास्र; रवी राणांच्या विधानावर म्हणाले…

राष्ट्रपतींकडे केली शक्ती विधेयकाला संमती देण्याची मागणी

यावेळी त्यांनी राष्ट्रपतींकडे शक्ती विधेयकाला संमती देण्याची मागणी केली. “महाराष्ट्राबाबत मी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना विनंती करतो की, प्रदीर्घ प्रलंबित अशा महाराष्ट्र शक्ती विधेयकाला त्यांनी संमती द्यावी. यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसंदर्भातील कायद्याचे सक्षमीकरण होईल”, असेही ते म्हणाले. तसेच बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्यायला हवी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray on badlapur sexual harassment case demand shakti law president spb