मुख्यमंत्र्यांना आव्हान; ‘जनप्रक्षोभ मोर्चा’द्वारे शक्तिप्रदर्शन

विद्यमान सरकार औटघटकेचे असून, ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवू, असे थेट आव्हान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. आमचे सरकार आल्यानंतर जेलभरो कार्यक्रम राबवू, असा इशाराही त्यांनी दिला.ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. खारकर आळी येथील आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाजवळील मैदानात या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. या सभेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘फेसबुकवर फक्त मजकूर प्रसारित केला म्हणून महिलेला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. पोलीस मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत. आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत. कारण ते ‘वर्षां’वर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आदेश घेत आहेत. एका व्यक्तीने स्वार्थापोटी आणि राक्षशी महत्त्वाकांक्षेपोटी राज्याला अंधारात नेले आहे’’, अशी टीका आदित्य यांनी केली. ‘‘हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नसून, काही तासांचे आहे. ते कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर सरकारला मदत करणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील’’, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

‘मातोश्री’वर येऊन दाखवा : अंधारे

ठाणे : ‘‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’च्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला आहे. पण, हिंमत असेल तर बावनकुळे यांनी ४८ तासांत ‘मातोश्री’वर येऊन दाखवावे, असे आव्हान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सभेत दिला.
‘लढायचे नाही तर जिंकायचे आहे’रोशनी शिंदेंच्या सर्व पोस्ट वाचल्या. त्या शिवसेनेच्या संस्कारातील पोस्ट होत्या. तिच्या पोस्टमध्ये एकही अपशब्द नाही. ती आई होऊ नये, म्हणून तिच्या पोटावर मारले गेले. हे सर्वात मोठे पाप आहे, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांशी चर्चा

ठाणे : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले. रोशनी शिंदे यांनी दिलेल्या अर्जाची दखल घेऊन ‘एफआयआर’ दाखल करून घ्यावा आणि दोषींना अटक करावी, अन्यथा जनप्रक्षोभ निर्माण झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील, असे आदित्य यांनी यावेळी सांगितले.