डोंबिवली- डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक वरील छत गळके झाल्याने पावसाच्या पाघोळ्या थेट फलाटावर पडत असल्याने प्रवाशांना छत्र्या उघडून उभे राहावे लागते. फलाट क्रमांक एक वर पाऊस सुरू झाला की यापूर्वी पावसाची टपटप असायची. आता छत अधिकच नादुरुस्त झाल्याने पाऊस सुरू झाला की फलाटावर पावसाच्या धारा सुरू होतात, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.

लोकल येण्यापूर्वी फलाटावर गळतीच्या ठिकाणी कोणी प्रवासी थांबत नाही. मात्र लोकल स्थानकात आली की प्रवाशांना छत्री उघडून लोकल मध्ये प्रवेश करावा लागतो. यावेळी लोकलमधून उतरणारे आणि चढणारे प्रवासी अशी झुंबड उडून उघडलेल्या छत्र्यांमुळे वादाचे प्रसंग प्रवाशांमध्ये उद्भवत आहेत.

डोंबिवली स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालया समोर आणि वन रुपी क्लीनिकच्या बाजुला पावसाची गळती सुरू आहे. फलाटावरील पावसाची गळती होत असल्याने ही गळती थांबवावी म्हणून अनेक प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापकांकडे तक्रारी केल्या आहेत. हा विषय रेल्वे बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याने आम्ही हा विषय संबंधित विभागाकडे कळविला आहे, अशी उत्तरे स्थानिक अधिकारी प्रवाशांना देत आहेत.

पावसाचे पाणी फलाटावर साचत असल्याने अनेक वेळा घाईत असलेला प्रवासी पाय घसरुन पडतो. शाळेतील विद्यार्थी दिवा भागातून लोकलने डोंबिवलीत येतात. त्यांना या साचलेल्या पाण्यामुळे कसरत करावी लागते. फलाटा वरील छताची दुरुस्ती लवकर केली नाही तर उर्वरित दोन महिने हा त्रास प्रवाशांना सहन करावा लागेल. अनेक वेळा मोबाईलवर बोलत प्रवासी या गळक्या भागातून जात असेल तर पावसाचे धारा अंगावर पडतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. 

काही दिवसापुर्वी फलाट क्रमांक दोन वरील कल्याण बाजू कडील फलाटावर छत नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत होती. याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रकाशित होताच, रेल्वे प्रशासनाने या भागात छताचे काम सुरू केले.

फलाट क्रमांक एकवरील छत नादुरुस्त होऊन पावसाच्या धारा फलाटावर पडून प्रवाशांना त्रास होत आहे हे माहिती असुनही रेल्वेकडून दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेतले जात नाही याविषयी प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. फलाटा वरील साचलेल्या पाण्यात पाय घसरुन पडून प्रवासी जखमी झाला. त्याचा गोंगाट झाला की मग रेल्वे हे काम हाती घेणार का असा प्रश्न समीर दामले या प्रवाशाने केला. रेल्वेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Story img Loader