तीन आठवडय़ांत २० लाखांचे मद्य जप्त; कारवाईसाठी तपासणी नाके, भरारी पथके स्थापन
वसई : निवडणुकीच्या तोंडावर केले जाणारे मद्याचे वाटप आणि चोरटी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क सज्ज झाले असून भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून तब्बल ८० गुन्हे दाखल करून २० लाख रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. परराज्यातून होणारी मद्यवाहतूक रोखण्यासाठी तीन नवीन तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या काळात मद्याचा बेसुमार वापर होतो. मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी मद्य दिले जाते. मोठय़ा प्रमाणात बेकायदा मद्याच्या पाटर्य़ा होत असतात. पालघर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी मतदारसंघ असून ग्रामीण भागातील मतदारांना भुलवण्यासाठी मद्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असतो. हे गैरप्रकार रोखण्यासाठी पालघरमधील राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. दापचरी येथे कायमस्वरूपी तपासणी नाका आहे. आता निवडणुकीच्या काळात विभागाने झाई आमगाव, उधवा आणि खंबाळे या तीन ठिकाणी तपासणी नाके तयार केले असून गुजरात राज्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
भरारी पथकाची स्थापना
मद्याच्या चोरटय़ा वाहतुकीबरोबर विभागाने मतदारसंघातील बेकायदा मद्यविक्री, मद्याचे वितरण आदी रोखण्यासाठी मतदारसंघानिहाय भरारी पथके स्थापन केली आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे प्रत्येक दोन मतदारसंघ मिळून एक भरारी पथक कार्यरत आहे. वसई-नालासापोरा, डहाणू-विक्रमगढ, पालघर-बोईसर आदी सहा मतदारसंघात ही भरारी पथके कार्यरत आहेत. मतदानापर्यंत ही पथके मतदारसंघात फिरून कारवाई करणार आहेत.
२० लाखांचे मद्य जप्त
महाराष्ट्र राज्य गुजरातला लागून असल्याने तेथून तसेच दीव-दमण येथून उत्पादन शुल्क चुकवून चोरटय़ा मार्गाने मद्य येत असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून चोरटे मद्य, हातभट्टीचे अड्डे यावर ८० हून अधिक गुन्हे दाखल केले असून २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विजय भुकन यांनी दिली. जिल्ह्य़ातील हातभट्टय़ांच्या अड्डय़ांवर कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले.
मद्य कारखान्यांवर नजर
पालघर जिल्ह्य़ात मद्यनिर्मितीचे एकूण सहा कारखाने आहेत. त्यात ३ देशी आणि ३ विदेशी मद्यनिर्मिती कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांतून बेकायदा मद्यविक्री होऊ नये यासाठी सर्व कारखान्यांवर नजर ठेवली जात आहे. या कारखान्यांवर २७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
निवडणूक काळात मद्याचा गैरवापर रोखण्यासाठी सज्ज आहोत. २४ तास भरारी पथके कार्यरत असून चार तपासणी नाक्यांवरून परराज्यातून येणारी चोरटी मद्याची वाहतूक रोखली जात आहे. ही कारवाई अधिक तीव्रतेने केली जाणार आहे.
– डॉ. विजय भुकन, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पालघर