ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील रेतीबंदर पुलावर गेल्या दोन आठवडय़ांत चार अपघात झाल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. या विभागाने रेतीबंदर पुलावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याचे काम हाती घेतल्याने चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी हा रस्ता धोकादायक झाल्याने गंभीर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण जेएनपीटीहून ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या लोकलगाडय़ांमध्ये अद्याप नोकरदार वर्गाला प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणेपल्याड राहणाऱ्या नोकरदार वर्गाला दररोज कामानिमित्त मुंबईत जाण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील वाहतुकीचा भार वाढू लागला आहे. मात्र गेल्या वर्षभरात बाह्य़वळण मार्गावरील रेतीबंदर पुलावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे.

या संदर्भात वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चार ते पाच वेळा पत्रव्यवहार करून त्यात रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर रस्ता दुरुस्ती होऊ शकली नव्हती. या संबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाले होते. तसेच गेल्या दोन आठवडय़ात या मार्गावर चार अपघात झाले आहेत.

यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील खड्डय़ांची तात्पुरती डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, त्या ठिकाणी डांबराचा मुलामा चढविला जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अपघात टाळण्यासाठी या पुलाची संपूर्ण दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

दोन आठवडय़ांत चार अपघात

*  ८ डिसेंबरला पनवेलहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकचा पाटा तुटला होता. या ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर होते. जर ट्रकमधील सिलिंडर उलटून खाली पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

* १६ डिसेंबरला ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणारा एक ट्रक बंद पडला होता. त्यामुळे रेतीबंदर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

* शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रेलरचा पाटा तुटला होता. या ट्रेलरचा पाटा तुटल्याने या मार्गावरील वाहतूक एकेरी झाली होती. हलकी वाहने मुंब्रा शहरातून वळविण्यात आलीहोती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला.

* शनिवारी मध्यरात्री ठाण्याच्या दिशेने येणारा ट्रक बाजूने जाणाऱ्या एका कंटेनरवर कलंडला. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक काही काळ बंद ठेवून महापे- ऐरोली मार्गावर वळविण्यात आली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration undertake temporary filling of potholes on mumbra bypass zws
Show comments