कल्याण : विठ्ठलवाडी पूर्व रेल्वे स्थानकाजवळ पदपथावर पक्की बांधकामे करून अनेक कुटुंब मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर राहत होती. रेल्वे स्थानकाला खेटून या झोपड्या असल्याने रेल्वे प्रशासनाने गुरुवारी रेल्वे सुरक्षा बळ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाला खेटुन असलेली पक्की बांधकामे जेसीबाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. रेल्वे प्रशासनाने या झोपडपट्टीतील रहिवाशांंना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. रेल्वेची कारवाई असल्याने रहिवाशांनी कारवाई पूर्वीच आपली घरे रिकामी केली होती. पदपथ अडवून सुमारे ५० हून अधिक पक्की बांधकामे याठिकाणी होती. पदपथ अडवून ही घरे असल्याने नागरिकांना पदपथाचा वापर करता येत नव्हता.

सुरुवातीला या भागातील रहिवाशांनी पत्र्याचे निवारे उभारून येथे राहण्यास सुरुवात केली होती. याठिकाणी कारवाई होत नाही म्हणून हळुहळू या भागातील रहिवाशांनी विटा, लोखंडाचा वापर करून पक्की बांधकामे केली होती. या झोपड्यांमधील भोजन आणि इतर सर्व व्यवहार रस्त्यावर होत होते. त्याचा प्रवाशांना अडथळा होता. या झोपड्यांमधील मुले रस्त्यावर खेळत असत. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता आहे. त्यामुळे अपघाताची भीती होती.

हेही वाचा…उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती

या झोपड्यांमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत असे. परिसरातील नळ जोडण्यांवरून हे रहिवासी पाणी भरत होते.विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक जवळ असल्याने या झोपड्यांंमधील लहान मुलांनी खेळताना एखादा दगड रेल्वे स्थानकाच्या दिशेने भिरकावला तर त्याचा प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता होती.यापूर्वी असे प्रकार या रेल्वे स्थानकात घडले आहेत. पदपथावरील या झोपड्यांमध्ये कोण, कुठून येऊन राहत आहे याचीही माहिती रेल्वे प्रशासनाला नव्हती. त्यामुळे कोणतीही घटना होण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात गुरुवारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाबाहेरील सर्व झोपड्या जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या.

हेही वाचा…कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणारी महिलांची टोळी अटकेत

कल्याण पूर्वेतील लोकग्राम भागातही अशाच प्रकारची कारवाई शुक्रवारी रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे.रेल्वेकडून होत असलेल्या या कारवाईबद्दल रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा पदपथावर झोपड्या उभ्या राहणार नाहीत याची काळजी घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Story img Loader