ठाणे : प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि वेगवान व्हावे यासाठी ठाणे जिल्हा परिषद आता ई- ऑफीस सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेऊन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात ही सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. या सुविधेमुळे जिल्हा परिषदेचा कारभार पेपरलेस होणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे कामकाज करताना कागदांचा अधिक वापर होतो. एखाद्या कामाची नस्ती तयार करण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढेपर्यंत अशा सर्वच कामांसाठी नस्ती तयार करण्यात येतो. प्रस्ताव तयार करणे आणि त्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी त्या नस्ती विविध विभागात पाठविण्यात येतात. यामुळे शासकीय कार्यालयात कागदपत्रांचे ढिग दिसून येतात. शिवाय, स्वाक्षरीसाठी नस्ती विविध विभागात पाठविण्यात येत असल्याने त्यासाठी काही कालावधी जातो. यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बराच वेळ खर्ची पडतो. यावर मात करून कार्यालयीन कामकाज वेगवान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी ई- ऑफीस सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात ही सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. या सुविधेमुळे जिल्हा परिषदेचा कारभार पेपरलेस होणार आहे. शिवाय, स्वाक्षरीसाठी विविध विभागात नस्ती पाठविण्यात येणार नसून डिजीटल स्वाक्षरीने प्रस्तावास मंजुरी दिली जाणार आहे. यामुळे नस्ती मंजुर प्रक्रीयेचा कालावधी कमी होऊन कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… ठाणे महापालिकेची धुळीवर नियंत्रण यंत्रणा बंदावस्थेत
अशी असेल ई- ऑफिस सुविधा
ई- ऑफीस सुविधेसाठी एक वेब ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम सुरु आहे. या सुविधेंतर्गत सर्वच विभाग ऑनलाईनद्वारे एकाच छताखाली आणले जाणार आहेत. या सुविधेसाठी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांना अधिकृत सरकारी ई-मेल आय़डी तयार करून दिले जाणार आहेत. या ई-मेल आयडीवर संबंधित अधिकाऱ्यांना नस्ती पाठविण्यात येणार असून संबंधित अधिकारी डिजीटल स्वाक्षरी करून प्रस्तावास मान्यता देणार आहे. किंवा काही त्रुटी असतील तर त्याची नोंद करणार आहेत. या सुविधेचे कामकाज कसे असेल आणि त्यावर नस्ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रामार्फत देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली.
हेही वाचा… ठाणे जिल्ह्यात सगुणा तंत्रज्ञानाने पेरलेल्या भात उगवणीत भेसळयुक्त लोम्बी, शेतकऱ्यांची चिंता वाढली
जिल्हा परिषदेच्या कामाला गती मिळावी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्या कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी ई- ऑफीस प्रणाली सुरु करण्यात येत आहे. – मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे</strong>.