ठाणे – जिल्ह्यात शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २०२५-२६ साठी प्रतिक्षा यादी क्रमांक १ मध्ये २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १ हजार १८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित १ हजार ५२३ विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी संदेश बघितलेला नाही तर, काही विद्यार्थ्यांचा अर्ज कागदपत्रांच्या त्रुटी अभावी रद्द करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. त्यामुळे आता, उर्वरित जागांसाठी लवकरच प्रतिक्षा यादी २ जाहीर केली जाईल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
वंचित, दुर्बल घटकातील मुलांना उत्तम दर्जेचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सध्या २०२५-२६ य़ा शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात ११ हजार ३२२ जागांसाठी २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. परंतू, निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार ७१३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले. त्यामुळे उर्वरित जागांसाठी प्रतिक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात आली. त्यानुसार, प्रतिक्षा यादी १ मध्ये २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दोन वेळा मुदत देऊन देखील त्यातील केवळ १ हजार १८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यातील १ हजार ५२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यापैकी काही पालकांनी अद्याप संदेश बघितला नसल्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकलेला नाही. तर, काही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रात त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे आता दुसरी प्रतिक्षा यादी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ही यादी लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
प्रतिक्षा यादीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
शहर निवड झालेले विद्यार्थी प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी
ठाणे ६२३ २९५
कल्याण-डोंबिवली ४८२ १८५
भिवंडी १८३ ८१
मिरा-भाईंदर २४ ०९
नवी मुंबई ६०२ २४८
उल्हासनगर ४७ २२
तालुका निवड झालेले विद्यार्थी प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी
अंबरनाथ ३०० १३२
भिवंडी १०९ ५४
कल्याण २१२ ८७
मुरबाड २७ २० शहापूर ९६ ४९