अंबरनाथ: राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एमबीबीएस प्रवेश घेता येणार आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश झाल्याने देशाच्या वैद्यकीय नकाशावर अंबरनाथचे नावही समाविष्ट झाले आहे. एकूण १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या वर्षासाठी होणार असून महाविद्यालय पसंतीसाठी अंबरनाथचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबईतील भायखळा आणि पुण्यातील ससून या शासकीय महाविद्यालयानंतर अंबरनाथचा तिसरा पर्याय असणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले जाते आहे.

अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने त्यांच्याकडून याबाबत अपेक्षा होत्या. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे काही वर्षांपूर्वी अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला मंजुरी मिळाली होती. १०० विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय आणि ४५० खाटांचे रूग्णालय अशी याची रचना होती. यासाठी अंबरनाथ पूर्वेतील आरक्षित जागेवर इमारत उभारण्यासाठीही यापूर्वीच मंजुरी आणि निधी उपलब्ध झाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षात प्रवेश होऊन अंबरनाथमध्ये अभ्यासक्रम सुरू होईल अशी आशा होती. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू करण्याला परवानगी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाच वेळी ९०० विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढली आहे. तर यामध्ये अंबरनाथ शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश झाला आहे. ऑनलाईन प्रवेश संकेत स्थळावर यापुढे अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेही नाव झळकणार असून प्रवेश क्षमताही दिसणार आहे. त्यामुळे अंबरनाथचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष शर्मा यांनी दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या मुंबईतील भायखळा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पुण्यातील ससून रूग्णालयानंतर या मार्गातील तिसरे शासकीय महाविद्यालय ठरणार आहे, असेही शर्मा म्हणाले आहेत.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी हॉटेल, इमारतींची पोलिसांकडून तपासणी; सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

एमबीबीएस प्रथम वर्षाची तयारी पूर्ण

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी आवश्यक सर्व प्रकारची तयारी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक प्राध्यापकांची भरती पूर्ण झाली असून प्रयोगशाळा, सामुग्री, वर्ग, विद्यार्थ्यांच्या रहिवासासाठी वसतीगृहाचे पर्यायही उपलब्ध झाल्याचे अधिष्ठाता डॉ. संतोष शर्मा यांनी सांगितले आहे. प्रक्रिया पूर्ण होताच अभ्यासक्रम सुरू होईल.

हेही वाचा : Mumbra Kalwa Vidhan Sabha Constituency : राष्ट्रावादीच्या बालेकिल्ल्यात कडवी झुंज, जितेंद्र आव्हाड विजयी चौकार लगावणार?

गेल्या अनेक वर्षांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माझी मागणी पूर्ण झाली असून अंबरनाथकरांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असून देशाच्या वैद्यकीय पटलावर अंबरनाथचेही नाव नोंदवले गेले आहे.

डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ