ठाणे – फौजदारी क्षेत्र निवडूनही मी कधीही गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही, मी नेहमी गुन्हेगारांविरोधात काम केले आहे, असे स्पष्ट मत पद्मश्री सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्यावतीने करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पात निकम यांनी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, वकिलांनी न्यायाधीशांचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या आवाजात चढ-उतार ठेवले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वकील म्हणून सामान्य माणसाला प्रामाणिक सल्ला देणे हे कर्तव्य आहे. खोटी आश्वासने देऊन फसवू नये. २६/११ च्या कसाब खटल्याचा उल्लेख करताना निकम म्हणाले, कसाबला फाशी देणे आव्हानात्मक नव्हते. पण दहशतवादामागील ताकद उघड करणे हे महत्त्वाचे होते. त्यामुळे खटला ‘इन कॅमेरा’ चालवायचा नाही, असा निर्णय घेतला. एखाद्या खटल्याचा अभ्यास चारही बाजूंनी करायला हवा. वकीली व्यवसायात सतत अद्यावत राहणे गरजेचे आहे. यासाठी ग्रंथ वाचन, संस्कृतचा अभ्यास आणि स्वतःला नव्या आव्हानांसाठी तयार ठेवणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत देवीचापाडा येथील जुगार, गांजाच्या अड्डयांमुळे नागरिक त्रस्त
लोकसभा निवडणुकीतील अनुभव सांगताना निकम म्हणाले, काही नेत्यांनी २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू भारतीयांनी घडवला असल्याचा आरोप केला. मात्र, कसाबला फाशी देण्याबाबत किंवा शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत पाकिस्तानने शंका उपस्थित केली नाही, पण काही महाभागांनी ती उपस्थित केली. त्यावेळी मी त्यांचा समाचार घेतला. विद्यार्थ्यांनी वकीली व्यवसायाकडे एक नव्या आव्हानाच्या दृष्टीने पाहावे आणि प्रामाणिकतेने काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला.