ठाणे : मुंबईमध्ये कमालीचे प्रदूषण वाढले आहे. संगीतासारखी शुद्धता कशातही नाही. संगीत हे खूप पवित्र, ऊर्जादायी आणि शक्ती देणारे आहे. ते कायम तसेच रहावे यासाठी संगीताला मुंबईप्रमाणे प्रदूषित करू नका, असा सल्ला ज्येष्ठ संगीतकार पद्माविभूषण इलिया राजा यांनी दिला. येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गुरुकुल प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित बासरी उत्सवात त्यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्काराने गौरविण्यात आले.
इलिया राजा म्हणाले, की खगोल शास्त्रज्ञाला दोन ग्रहांतील अंतर माहीत असते. तसेच संगीतकाराला दोन सुरांतील अंतर माहीत असते. जेव्हा एकापेक्षा जास्त वादक वाजवतात त्याला ‘सिम्फनी’ म्हणतो… पण ‘सिम्फनी’ इतक्या सहज होत नाही. त्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते. आपण सहसा कुठल्या कार्यक्रमाला जात नाही. मात्र यावेळी पंडित चौरसिया यांच्यासाठी ठाण्यात आलो, असे ते म्हणाले. पं. हरिप्रसाद चौरसिया म्हणाले, की इलिया राजा यांचे संगीतातले कामही राजासारखेच आहे. यंदाचा हा ‘बासरी उत्सव’ दिवंगत तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित करण्यात आला होता.