ठाणे : एकेकाळी ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुखपद प्रभावी पद म्हणून ओळखले जाते. परंतु अक्षय शिंदे चकमकीनंतर विरोधी पक्षाकडून ठाणे पोलिसांवर केले जात असलेले आरोप , माजी पोलीस अधिकारी संजय पांडे यांच्या खंडणी प्रकरणाचा तपास, राजकीय अस्थिर वातावरण यामुळे आता गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पद काटेरी मुकुटाप्रमाणे झाले आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्तपदावरील शिवराज पाटील यांच्या बदलीचे आदेश निघाल्याने या पदासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. परंतु त्यांनाही या पदावर तितका काही रस नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी कोणाची वर्णी लागते की, शिवराज पाटील यांनाच निवडणुकीच्या कालावधीत पदावर राहावे लागते याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात गेल्याकाही दिवसांपासून बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेत ठाणे, वागळे इस्टेट, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी असे पाच युनीट, खंडणी विरोधी पथक, अमली पदार्थ विरोधी पथक, मध्यवर्ती गुन्हे शोध पथक, मुद्देमाल शोध कक्ष, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष या महत्त्वाच्या पथकांचा सामावेश आहे. याचे प्रमुखपद गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्तांकडे असते. ठाणे शहर पोलीस दलातील हे मलईदार खाते मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नेहमी चढाओढ पहायला दिसून येते. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे हे पद काटेरी मुकुटा प्रमाणे ठरू लागले आहे.

हे ही वाचा…उत्सवांच्याकाळात महिला सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीसांची गस्त

बदलापूर येथे दोन लहान शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणानंतर आरोपी अक्षय शिंदे याला कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले. अक्षय शिंदे याला अटक झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असतानाच, त्याला पोलिसांच्या मोटारीमधून आणले जात होते. त्यावेळी अक्षय शिंदे याला चकमकीमध्ये ठार करण्यात आले. अक्षय शिंदे याला ठार केल्यानंतर पोलिसांवर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली जात होती.

हे ही वाचा…कल्याणमधील गोविंदवाडीत गाई, म्हशी दुधाळ होण्यासाठीची बनावट औषधे जप्त

माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्याविरोधातही एका व्यावसायिकाने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पांडे यांनी पैसे उकळल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. राजकीय परिस्थितीमुळेही ठाणे पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी हैराण आहेत. त्यातच आता शिवराज पाटील यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये बदली झाली आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे मलईदार खाते घेण्यास अधिकारी अनुत्सक बोलले जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ‘साईड ट्रॅक’वरील दोनच पोलीस अधिकारी या पदासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे काटेरी मुकुट कोणाला मिळणार अशी कुजबुज सुरू झाली आहे.