कल्याण : नवीनच लग्न झाल्याने जावयाने मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्याचा बेत आखला होता. तर, जावयाने काश्मीरऐवजी पहिले पार्थनेसाठी मक्का-मदिनेला जावे, असा आग्रह सासऱ्याने जावयाकडे धरला होता. याविषयावरून सासरा-जावई यांच्यातील वादावादी वाढत गेल्याने गुरुवारी रात्री सासऱ्याने आपल्या जावयाला कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागात गाठले. जावयावर ॲसीड हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. सासरा या घटनेनंतर पळून गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला. या घटनेनंतर पसार झालेल्या सासऱ्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची पथके विविध भागात रवाना झाली आहेत. जखमी जावयावर कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इबाद फालके असे जावयाचे नाव आहे. जकी खोटाल सासऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा…२६०० कातकरी कुटुंबांचा घराचा प्रश्न वनविभागाच्या हाती ! वनविभागाच्या जागांना गावठाणाचा दर्जा मिळण्याबाबत प्रतीक्षा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी माध्यमांना सांगितले, जकी खोटाल यांच्या मुलीचे नुकतेच इबाद फालके यांच्या बरोबर लग्न झाले होते. इबाद यांनी मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्याचे निश्चित केले होते. तर, सासरा जकी यांनी इबाद यांनी काश्मीरला जाण्याऐवजी पहिले मक्का मदिना येथे प्रार्थनेसाठी जावे असा आग्रह धरला होता. या विषयावरून सासरा आणि जावई यांच्यात शाब्दिक वादावादी सुरू होती. इबाद पत्नीसह काश्मीरला जाण्यावर ठाम होते. सासरे जकी यांचा त्यास विरोध होता. अनेक दिवस ही धुसफूस सुरू होती.

गुरुवारी रात्री जावई इबाद कल्याणमधील लाल चौकी भागातून आपल्या घरी पायी चालले होते. सासरे जकी खोटाल यांनी इबाद यांना रस्त्यावर थांबवून घेतले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा मधुचंद्राला जाण्याच्या विषयावरून शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या सासरे जकी यांनी सोबत आणलेले ॲसिड अचानक जावयाच्या अंगावर फेकले. अचानक घडलेल्या याप्रकाराने इबाद अस्वस्थ झाले. या घटनेनंतर सासरा तेथून पळून गेला. इबादच्या चेहरा, शरीराच्या इतर भागावर ॲसिडमुळे जखमा झाल्या आहेत. बाजारपेठ पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या जकी खोटाल यांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा…आदिवासी बहुल जिल्ह्यातील डायलिसिस यंत्रणाच डायलिसीवर, शहापूर डायलिसिस केंद्रात पूर्णवेळ तज्ज्ञांचा अभाव

मधुचंद्रावर जाण्यावरून जावई, सासरे यांच्यात काही दिवस धुसफूस सुरू होती. जावई काश्मीरला जाण्यावर ठाम होते. तर सासरे खोटाल जावयाने मक्का-मदिनेला जावे याविषयावर ठाम होते. या वादातून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केला. सासरा पसार झाला आहे. त्यांच्या शोधार्थ पोलीस तपास पथके विविध भागात गेली आहेत. याप्रकरणाचा कसून तपास करणार आहोत. सुरेशसिंग गौड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाजारपेठ पोलीस ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After argument father in law attacked son in law with acid over honeymoon plans sud 02