‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या एका महिलेनं आपल्या मृत जोडीदाराची १९ कोटी रुपयांची संपत्ती हडपल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेनं लग्न झालं नसतानाही लग्नाचं बनावट प्रमाणपत्र बनवून आपल्या ‘लिव्ह इन रिलेशन’मधील जोडीदाराची मालमत्ता हडपली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेसह अन्य दोघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास नागपाडा पोलीस करत आहेत.

आरोपी महिलेनं आपल्या ‘लिव्ह-इन’ जोडीदाराशी लग्न केल्याचं खोट प्रमाणपत्र बनवलं होतं. या प्रमाणपत्राच्या आधारे तिनं सुमारे १९.३ कोटी रुपयांची संपत्ती हडप केली. ही महिला पूर्वी बारगर्ल म्हणून काम करायची. तिने एका पाद्रीच्या आणि त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने ही संपत्ती हडपली आहे. अंजली अग्रवाल (३०) असं आरोपी महिलेचं नाव आहे.

मागील काही काळापासून ती एका व्यक्तीसोबत ‘लिव्ह-इन रिलेशन’मध्ये राहत होती. दरम्यान, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचा ‘एचआयव्ही’मुळे झाला. त्याच्या पश्चात कुणीही वारसदार नसल्याचं सांगत आरोपी अंजलीने मृत जोडीदाराच्या नावावर असलेली जमीन, ठाणे येथील तीन फ्लॅट्स आणि सोन्याचे दागिने यांचा ताबा घेतला.

हेही वाचा- तरुणीचा पाठलाग करत असल्याचा होता आरोप; ५० वर्षीय व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच झाला मृत्यू

ही संपत्ती हडपण्यासाठी तिने पाद्री थॉमसर गोडपवार (५०) आणि त्याचा सहकारी महेश काटकर (३७) यांच्या मदतीने लग्न केल्याचं खोटं प्रमाणपत्र बनवून घेतलं. याबाबत मृत व्यक्तीच्या आईला कुणकुण लागली आणि अंजलीचं कृत्य उघडकीस आलं. याप्रकरणी मृताच्या आईने आरोपी अंजलीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अंजलीसह पाद्री थॉमसर आणि महेश काटकर यांना अटक केली आहे. सर्व आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Story img Loader