ठाणे : एकेकाळी ‘लोकांचा लोकनाथ एकनाथ’ गाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्याचा आढावा घेत त्यांना राजकीय पटलावर उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याच पावलावर पाऊल ठेवत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर आधारित गाणे नुकतेच त्यांच्या समर्थकांकडून प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘शौर्याचा वारसा, धैर्याचा आरसा, दुजा एकनाथ जसा, श्रीकांत हा…’ या ओळींच्या माध्यमातून खासदार डॉ. शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साम्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरविकास मंत्रीपदी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी वर्षभरापूर्वी दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. त्यात ‘लोकांचा लोकनाथ एकनाथ’ या गाण्याने एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राच्या पटलावर उभारी मिळाली. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर आधारीत ‘धर्मवीर’ चित्रपटाने एकनाथ शिंदे यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर झालेली राजकीय उलथापालथी ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा एकनाथ शिंदे यांचा प्रवास नाट्यमय आहे. या सहा महिन्यांच्या प्रवासात या गाण्यांच्या माध्यमातून प्रतिमा उजाळण्याचा प्रयत्न झाला. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी ‘श्रीकांत हा…’ हे डॉ. शिंदे यांच्यावर आधारित गाणे प्रदर्शित केले आहे.

VIDEO ::

हेही वाचा >>> माघी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मलंग गडावर

शिवसेनेचा योद्धा, महाराष्ट्राचा वाघ आणि दिल्लीत भगवा रोवणारा दमदार खासदार अशा शब्दांमध्ये खासदार डॉ. शिंदे यांचा गौरव या गाण्याच्या निमित्ताने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे सतत कामात व्यस्त असतात त्याचप्रमाणे डॉ. शिंदे यांचेही अविरत काम दाखण्यात आले आहे. गाण्याच्या ध्रुवपदातच डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात साम्य दाखवण्यात आले आहे. दुजा एकनाथ जसा… असा शब्दात दोघांची अप्रत्यक्ष तुलना करण्यात आली आहे. पावनखिंड, फर्जंद आणि फत्तेशिकस्त यांसारख्या चित्रपटांना संगीत देणारे देवदत्त मनिषा बाजी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून अवधूत गांधी यांनी हे गाणे गायले आहे.

हेही वाचा >>> मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची दुसरी धमकी, ट्वीटर हँडलवर देण्यात आली माहिती

या गाण्याच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकीय पटलावर नेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेत असतानाच खासदारांना राज्याच्या दौऱ्यावर पाठवण्यात आले होते. तेव्हापासून डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्याच्या राजकारणात सक्रीय प्रवेश झाला होता. वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून डॉ. शिंदे यांनी राज्यभरात काम केले. पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर डॉ. श्रीकांत शिंदेही कमालीचे सक्रीय झाले. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या कामासह राज्यातील विविध धोरणात्मक कामे, बैठकांमध्ये खासदार डॉ. शिंदे यांचा सहभाग असतो. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या राज्यभरात त्यांनी विविध सभाही घेतल्या आहेत. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्यस्तरावरचा प्रभाव वाढला आहे. त्यातच आता या गाण्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.