अंबरनाथ : अंबरनाथचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर पनवेलकर यांनी या हल्ल्यात मुरबाडचे भाजप आमदार किसन कठोर यांच्यावर आरोप केले. तर हे आरोप फेटाळून लावत याप्रकरणी आपण बदनामीचा खटला दाखल करणार आहोत अशी माहिती आमदार कथोरे यांनी दिली आहे. या गोळीबारानंतर सुरू असलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौकाजवळ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांचे सिताई सदन हे निवासस्थान आहे. या निवासस्थानी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दुचाकीवरून आलेले हे हल्लेखोर गोळीबारानंतर फरार झाले. या घटनेने अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेवेळी विश्वनाथ पनवेलकर हे घरी नव्हते मात्र, अंबरनाथ मध्ये परतल्यानंतर पनवेलकर यांनी या हल्ल्याप्रकरणी खळबळजनक आरोप केले. या हल्ल्यात मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा हात असल्याचा आरोप विश्वनाथ पनवेलकर यांनी केला आहे.
आमच्यावर खोटे नाटे आरोप करायचे, आमचे उद्योग धंदे बंद पाडायचे हे प्रकार किसन कथोरे यांनी सुरू केले आहेत, असा आरोपही पनवेलकर यांनी बोलताना केला. त्यांनी काही कार्यकर्ते सोडले असून त्यांच्या माध्यमातून हे प्रकार केले जात आहेत, असेही पनवेलकर म्हणाले. आम्ही घराबाहेर पडू नये अशी त्यांची इच्छा असावी असेही पनवेलकर म्हणाले. पनवेलकर यांच्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. आम्हाला वाटत असलेला संशय आम्ही पोलिसांना कळवला आहे. मात्र अद्याप पोलीस तपासाची माहिती आम्हाला नाही, असेही पनवेलकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे. तर आमदार किसन कथोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
बदनामीचा खटला दाखल करणार
या प्रकाराची माहिती नाही. मात्र मी लवकरच त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे. तसेच येत्या काही दिवसात पत्रकार परिषद घेऊन काही प्रकरणे ही उघडकीस आणणार आहे, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.