निधीचा अभाव आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे बदलापूरमध्ये होऊ घातलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक चार वर्षांनंतरही रखडलेलेच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या वर्षांत तरी हे काम पूर्ण होऊन स्मारक सर्वासाठी खुले होईल, अशी आशा होती. मात्र डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधीही हे काम पूर्ण झालेले नाही.
बदलापूर पश्चिमेतील सोनिवली येथील जवळपास चार एकराच्या भूखंडावर ५ कोटी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक होणार होते. त्यात उद्यान, वाचनालय, पुतळा, निवासी व्यवस्था, कारंजे अशा गोष्टींचाही समावेश असणार आहे. मात्र काम सुरू होऊन गेल्या चार वर्षांपासून येथे फक्त गवतच वाढले आहे. निधीअभावी स्मारकाचा सांगाडाच बनलेला असून इतर संपूर्ण काम ठप्प आहे. या स्मारकासाठी राज्य सरकारच्या वैशिष्टय़पूर्ण अनुदानातून ५० लाखांचा निधी मंजूर झाला होता. तसेच कुळगाव-बदलापूर नगरपालिकेनेही याबाबत ठराव केला होता. ऑगस्ट २०१२ मध्ये या स्मारकाचा सांगाडा तयार झाला होता. मात्र पुढील कामासाठी निधी नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाच कोटींच्या निधीची मागणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला दोन वर्षे उलटूनही याबाबत एकही पैसा मिळू शकलेला नाही. या वर्षी १४ एप्रिलपूर्वी या स्मारकाच्या प्रवेशद्वारावर काही नक्षीकाम करण्यात आले होते. तसेच प्रवेशद्वारासह संरक्षक भिंतीला रंगरंगोटी करण्यात आली होती. त्या वेळी स्मारकाचे काम पुढे सरकेल अशी आशा होती. मात्र त्यानंतरही काम रेंगाळल्याने आंबेडकरी जनेतचा हिरमोड झाला आहे. या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, पालिका मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता राज्य शासनाकडे यासाठीच्या निधीसाठी प्रस्ताव पाठवलेला असून तो शासनदरबारी प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली. तर ‘दुसऱ्या टप्प्यांतील निधी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर होणार असून लवकरच त्याचे काम सुरू होईल,’ असा दावा आमदार किसन कथोरे यांनी केला.
आता पुढच्या जयंतीदिनाचा हवाला
कुळगाव-बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी आता हे स्मारक पूर्ण होण्यासाठी आंबेडकर जयंतीचा हवाला दिला आहे. ‘वैशिष्टय़पूर्ण डिझाइन काम असल्याने हे काम काही दिवस रेंगाळले होते. मात्र आता शासनाच्या निधीची वाट न पाहता पालिका यासाठी ५० लाख देऊन हे काम मार्गी लावले जाईल. त्यामुळे १४ एप्रिल २०१७ मध्ये येथे दर्शनास जाता येणे शक्य होईल,’ असे ते म्हणाले.