ठाणे : दिवा परिसरातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी दिल्यानंतर उशीरा का होईना ठाणे महापालिका प्रशासनाने आता कारवाईसाठी कठोर पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग रहिवाशांना नोटीसा पाठविण्याबरोबरच आता जमीन मालकासह बेकायदा इमारत उभारणाऱ्यांविरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सूरूवात केली आहे. अनंत पार्क या बेकायदा इमारतीची उभारणी केल्याप्रकरणी जमीन मालकासह बांधकाम व्यावसायिकांवर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित बांधकामांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी पालिकेकडून सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी शहरातील बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरू असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबविण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले आहेत तर, उर्वरित ५२ इमारतींमधील रहिवाशांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. पालिकेचे पथक याठिकाणी कारवाईसाठी गेले असता, त्यास रहिवाशांनी विरोध केला होता. तसेच प्रशासनाविरोधात रहिवाशांनी आंदोलनही केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांची रहिवाशांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. असे असले तरी, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उशीरा का होईना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बेकायदा बांधकामांविरोधात कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रात ७६९ बेकायदा बांधकामे असून त्यापैकी ६६३ बांधकामांची नोंद प्रभाग समितींच्या बीट निरीक्षकांनी बीट नोंदवहीत केल्याचे सांगत ती तोडण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी नुकतेच दिले आहेत. तसेच या बांधकामांप्रकरणी त्यांनी सहाय्यक आयुक्तांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली असून दिवा, मुंब्रा आणि कळवा या तीन प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता जमीन मालकासह बेकायदा इमारत उभारणाऱ्यांविरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे.

एमआरटीपीचे दोन गुन्हे दाखल

मोहन तुकाराम मढवी विरुद्ध ठाणे महापालिका या दाव्याच्या अनुषंगाने ११ जानेवारी रोजी पालिका प्रशासनाने दिव्यातील अनंत पार्कमधील १, २, ३ या इमारतींची पाहाणी केली. तसेच मालमत्ता विभागाकडे असलेल्या अहवालातील बांधकाम करारानुसार मेसर्स मंगला कंस्ट्रक्शन तर्फे ज्ञानेश्वर अनंत मुंडे यांनी अनंत पार्कमधील १, २, ३ या इमारतीचे तळ अधिक चार मजल्याचे बांधकाम विकासक म्हणून केल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. पालिकेने इमारतीमधील सदनिकाधारक आणि गाळेधारकांना बांधकामासंबंधी महापालिकेच्या परवानगीबाबतची अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, ते कागदपत्रे सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे पालिकेने १५ जानेवारी रोजी नोटीस बजावून ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेतली. त्यात बांधकामासंबंधीच्या परवानगीची कागदपत्रे सादर केलेली नसल्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचे पालिकेने जाहीर केले. याप्रकरणी दिवा प्रभाग समितीचे लिपीक संतोष लहाने यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मुंब्रा पोलिसांनी जमीन मालक मोहन तुकाराम मढवी आणि मेसर्स मंगला कंस्ट्रक्शन तर्फे ज्ञानेश्वर अनंत मुंडे यांच्याविरोधात एमआरटीपी अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.