कल्याण : डोंबिवली पलावा येथे राहत असलेल्या एका हाॅटेल व्यावसायिकाने एका महिलेला सतरा वर्षापूर्वी लग्न करण्याचे आमिष दाखविले. या महिलेबरोबर काही वर्ष लग्नाचे आमिष दाखवून वास्तव्य केले. त्यानंतर विविध कारणांनी महिलेला त्रास देऊन तिला मारहाण केली. या महिलेच्या घरातील सोन्याचा ऐवज महिलेच्या नकळत व्यावसायिक घेऊन गेला. याप्रकरणी पीडित महिलेने सोमवारी येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पीडित महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की २००८ मध्ये गुन्हा दाखल व्यावसायिकाने आपणास लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर २०१२ पर्यंत आम्ही दोघे ठाणे येथे एकत्र राहत होतो. व्यावसायिकाने आपल्या बरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे आपण तीन वेळा गर्भवती राहिले. परंतु, व्यावसायिकाला आपल्या बरोबर लग्न करायचे नसल्याने त्यांनी आपणास तीन वेळा ठाण्यातील खासगी रुग्णालयात गर्भपात करण्यास भाग पाडले. व्यावसायिक आपणास दारू पिऊन मारहाण, शिवीगाळ करत होता. या त्रासाला कंटाळून आपण आपल्या नातेवाईकाच्या घरी कल्याणमध्ये राहण्यास आले. तेथेही या व्यावसायिकाचे येणेजाणे होते, असे प्राथमिक अहवालातील तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा…कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची दिल्लीतून धमकी
व्यावसायिकाने त्यांच्या हाॅटेलमध्ये भागीदार होण्यासाठी आपल्याकडे सुमारे सात ते आठ लाख रूपयांची मागणी केली होती. ही रक्कम आपण न दिल्याने आपणास मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्यावेळी पोटात लाथ मारल्याने पीडित महिलेला दुखापत झाली होती. कल्याणमधील खासगी रुग्णालयात आपल्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. आपण खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना व्यावसायिकाने आपल्या घरी जाऊन त्यांच्या जवळील चावीने घर उघडून घरातील सुमारे साडे सात तोळ्याचा ऐवज काढून घेतला आहे, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा…कल्याण : तीन महिन्यांत ५७५ कोटीच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान
या सर्व प्रकरणाची पीडित महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी व्यावसायिका विरुध्द पीडित महिलेच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. महिला साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एन. घस्ते याप्रकरणाचा तपास करत आहेत.