ठाणे : मीटरवर चालणाऱ्या रिक्षाच्या भाडेदरात तीन रुपयाप्रमाणे वाढ करण्यात आली असतानाच, आता ठाण्यातील शेअरिंग रिक्षा चालकांनी देखील भाडेवाढीसाठी तगादा लावला आहे. यासाठी रिक्षा चालकांची त्यांच्या संघटनेसोबत चर्चा सुरु आहे. यावर येत्या काही दिवसात तोडगा निघेल आणि प्रतिप्रवासी मागे पाच रुपयांनी वाढ होईल अशी शक्यता रिक्षा चालकांकडून वर्तवली जात आहे.

वाढत असलेली महागाई, वाढते इंधनचे दर त्यात, रिक्षा देखभाल दुरुस्तीसाठी होणारा खर्च हा रिक्षाचालकांना परवडणारा नाही. त्यामुळे रिक्षाच्या भाडेदरात वाढ करावी अशी मागणी परिवहन विभागाकडे केली जात होती. त्यानुसार, १ फेब्रुवारी पासून मीटर रिक्षाच्या भाडेदरात वाढ करण्यात आली. मीटर रिक्षाचे दर २३ रुपयांवरुन २६ रुपये करण्यात आले आहे. यापाठोपाठ आता, मीटर रिक्षाप्रमाणे शेअर रिक्षांच्या प्रवासी भाडेदरात वाढ करावी असा तगादा ठाणे शहरातील शेअर रिक्षा चालकांकडून लावला जात आहे. यासाठी शेअर रिक्षा चालकांनी रिक्षा चालकांच्या संघटनेकडे धाव घेतली आहे.

ठाण्यातील एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, शेअर रिक्षा भाडेवाढी संदर्भात, शहरातील अनेक रिक्षा चालकांनी माझ्याकडे विचारणा केली असून येत्या काही दिवसात रिक्षा चालकांची बैठक घेऊन भाडेवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल. तर, ठाणे स्थानक ते लोकमान्य नगर पर्यंत २३ रुपये मीटरप्रमाणे ७५ रुपये भाडेदर होत होते. तेच आता, २६ रुपये मीटर प्रमाणे ८५ रुपये भाडेदर होत आहे. तसेच शेअर रिक्षा ठाणे स्थानक ते लोकमान्य नगर पर्यंत प्रति प्रवासी २० रुपये भाडे आकारले जाते. त्यामुळे एका फेरीत तीन प्रवासी नुसार केवळी ६० रुपये भाडे मिळत असून यात शेअर रिक्षा चालकांचे नुकसान होत असल्याची खंत ठाण्यातील एका रिक्षा चालकाने व्यक्त केली.

परिवहन विभागाच्या नियमानुसार शेअरिंग रिक्षाच्या दरात ३० रुपयांपर्यंत वाढ करु शकतो. त्यामुळे शेअर रिक्षांच्या दरात वाढ झाली तर, ती अधिकृतरित्याच असेल अशी प्रतिक्रिया एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांनी दिली.

ठाण्यातील काही शेअर रिक्षा चालकांचे म्हणणे…

करोना काळात प्रति प्रवासी मागे २५ रुपये भाडेदर आकारण्यास सुरुवात केली होती. परंतू, याला प्रवाशांनी विरोध केला त्यावेळी पुन्हा २० रुपये प्रमाणे भाडेदर आकारले जात होते. त्यामुळे यावेळी तरी प्रवासी २५ रुपये भाडेदर देतील का याची शंका आहे, अशी प्रतिक्रिया यशोधननगर शेअर रिक्षा स्टँड वरील एका रिक्षा चालकाने दिली. तर, सीएनजीचा खर्च वाढला आहे, त्यात ठाण्यात रिक्षांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रति प्रवासी मागे २० रुपये भाडेदर परवडणारे नाहिये यासाठी शेअर भाडेदरात वाढ झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया वर्तकनगर मधील एका रिक्षा चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Story img Loader