ठाणे : देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवंडीतील पडघा हा भाग अतिसंवेदनशील म्हणून पूर्वीपासूनच चर्चेत आहे. शनिवारी अकिफ नाचण याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. त्यानंतर पडघ्यामधील तपास यंत्रणांच्या कारवाईविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहे. यापूर्वी मुंबई साखळी बाँबस्फोट प्रकरणात साकीब याला अटक झाली होती. त्यानंतर पडघा तपास यंत्रणांच्या नोंदीवर आला होता.
एनआयए, दहशतवादी विरोधी पथके यासह विविध तपास यंत्रणांचे पडघ्यावर लक्ष आहे. पोलिसही या भागात डोळ्यात तेल घालून असतात. पडघा सर्वाधिक चर्चेत आला तो म्हणजे, साकीब नाचण याच्या अटकेतनंतर. ‘सिमी’ या संघटनेशी संबंधित तसेच मुंबईत २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सामील असलेला साकीब नाचण याला पडघ्यातील त्याच्या बोरीवली गावातून अटक झाली होती. त्याच्या अटकेदरम्यान, काही ग्रामस्थांनी पोलिसांना अडविण्याचा आणि हल्ल्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे पोलीस या गावात प्रवेश करताना अधिक सावध असतात.
साकीब याची २०१७ मध्ये सुटका झाली. सुटकेनंतर गावात परतलेल्या साकीबचे जंगी स्वागत झाले होते. आता एनआयएने अकिफ नाचण याला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा पडघा चर्चेत आला आहे. आकिफच्या अटकेनंतर आकिफ कोण अशी चर्चा रंगली होती. साकीबचा त्याच्याशी काही संबंध आहे का, या दिशेनेही एनआयए तपास करत आहे. काही दिवसांपूर्वी पडघा भागातून एनआयएने शरजील शेख आणि झुल्फिकार बडोदावाला या दोघांना ताब्यात घेतले होते. याच प्रकरणातून आकिफला ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. अकिफ हादेखील पडघा येथील बोरीवली गावात राहतो. त्याचा या गावात मोठा बंगला आहे. त्याचा मोठा भाऊ बांधकाम व्यवसायिक म्हणून प्रसिद्ध आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये पती-पत्नीच्या वादात मेहुण्यांनी पतीची हत्या केली आणि…
गाव आर्थिक समृद्ध…
पडघा येथील बोरीवली गाव हे सुमारे सात ते आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात कोकणी मुस्लीम सर्वाधिक राहतात. आदिवासींचेही प्रमाण सुमारे ३० टक्के इतके आहे. येथील गावकरी व्यवसायिक आहेत. अनेकांच्या लाकडांच्या वखारी आहेत. लाकडांच्या विक्रीतून अनेकजणांची आर्थिक समृद्धी झाली. येथील लाकडांना मागणी असल्याने बहुतांश ग्रामस्थांचे दोन ते तीन मजल्यांचे कोट्यवधी रुपयांचे बंगले पाहायला मिळतात. तसेच अनेकांच्या जमिनी आहेत.