ठाणे – जम्मू काश्मिर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर एकाच दिवसात मुंबई ते श्रीनगर या विमानप्रवासाच्या दरात मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. एप्रिल ते जून हा कालावधीत जम्मू-काश्मिरला जाण्याचा उत्तम कालावधी मानला जातो. यादिवसात विविध राज्यातून त्यातही, महाराष्ट्रातून सर्वाधिक पर्यटक जम्मू – काश्मिरला जातात. ऐरव्ही मुंबई ते श्रीनगर या विमान प्रवासाचे दर प्रती व्यक्ती १२ हजार ते १५ हजार रुपये इतके असायचे. परंतू, या घटनेनंतर एका दिवसात मुंबई ते श्रीनगर विमान प्रवासाचे दर प्रती व्यक्ती ४ हजार झाले आहे. या हल्ल्याचा वैमानिक कंपन्यांसह, पर्यटन कंपन्याना तसेच जम्मू- काश्मिर तसेच श्रीनगर येथी हॉटेल व्यावसायिकांना यांचा फटका बसला आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २८ जणांना आपले जीव गमवावे लागले. परंतू, या हल्ल्यानंतर जम्मू – काश्मिरमध्ये भ्याड शांतता पसरली असून याचा परिणाम तेथील पर्यटन व्यवसायावर झाला आहे.
एप्रिल ते जून हा कालावधी जम्मू – काश्मिरला जाण्यासाठी योग्य मानला जातो. यादिवसात काश्मिरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे विमान प्रवासापासून ते अगदी हॉटेल पर्यंत असे सर्वच दर वाढलेले दिसतात. या कालावधीत पर्यटन कंपन्यांकडून देखील विविध आकर्षित सवलती असलेले जम्मू – काश्मिर या स्थळाचे पॅकेज तयार केले जातात. त्यामुळे याकालावधीत जम्मू – काश्मिरला जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. यात, महाराष्ट्रातील नागरिक जास्त असल्याचे मत एका पर्यटक कंपनीने व्यक्त केले.
जम्मू – काश्मिर मध्ये श्रीनगर, हाऊस बोट, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग हे पर्यटनासाठी महत्त्वाची ठिकाण आहेत. पर्यटन कंपनीकडून पाच ते सहा दिवसाचे याठिकाणी फिरण्याचे पॅकेज तयार केले जाते. या पॅकेजमध्ये प्रवास, जेवण, आणि राहण्याचा खर्च समाविष्ट असतो.
दर्जेदार हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था पाहिजे असेल तर, प्रति व्यक्ती ६० ते ७० हजार इतका खर्च होतो. तर, सामान्य हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असेल तर, ३० ते ४० हजार इतका खर्च येतो. तसेच जोडप्यांसाठी दर्जेदार हॉटेलसाठी ८० ते ९० हजार आणि सामान्य हॉटेलसाठी ४० ते ५० हजार इतका खर्च येतो, या पद्धतीने कश्मिर टूर चे पॅकेज तयार केले जाते. याठिकाणी जाण्यासाठी पर्यटक देखील उत्सूक असतात. परंतू, या घटनेनंतर आता, कोणी काश्मिर ला जाईल का? असा प्रश्न पर्यटक कंपन्यांमध्ये निर्माण झाला आहे.
पर्यटक कंपनीचे म्हणणे…
जम्मू – काश्मिरमध्ये एक वेगळ्या प्रकारचे सौंदर्य आहे, हे पर्यटकांनी पहावे असा आमचा हट्टाहास असतो. त्यामुळे पर्यटकांना परवडेल अशा पद्धतीनेच आम्ही जम्मू-काश्मिर टूर चे पॅकेज तयार केले जाते. परंतू, अनेकदा काही पर्यटक जम्मू-काश्मिरला जाण्यासाठी घाबरतात, पण आम्ही त्यांना विश्वास देतो की, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. आणि खरंच इतक्या वर्षात पहलगाम सारखा प्रकार कधी घडलेला नव्हता. हा प्रथमच घडलेला आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये आता जम्मू-काश्मिर या ठिकाणी जाण्यासाठी भिती निर्माण झाली आहे. आमच्याकडे पुढच्या महिन्यासाठी जम्मू-काश्मिरचे नोंदणी झाली होती. या घटनेमुळे पर्यटकांनी ही नोंदणी रद्द केली आहे. यामुळे पर्यटक कंपन्यांचेही नुकसान झाले आहे, अशी खंत एका पर्यटक कंपनीचे रोहन ढवळे यांनी व्यक्त केली.
श्रीनगर येथील हॉटेल व्यावसायिकाचे म्हणणे…
पहलगाम येथील घटना ही जम्मू- काश्मिर ला कालिमा फासणारी आहे. या घटनेमुळे पूर्ण काश्मिर हादरले आहे. आम्ही इथे हिंदू-मूस्लिम असा भेद कधी केला नाही, आम्ही नेहमी एकत्रच राहिलो आहोत. प्रत्येकाच्या संस्कृतीचा आम्ही आदर केला आहे. या कालावधीत येणारे पर्यटक हे आमचे पाहुणे असतात, त्यांच्यामुळेच आमचा व्यवसाय चालत असतो. परंतू, या प्रकारामुळे सर्वकाही संपले असून हे कधी सुरळित होईल याकडे लक्ष लागले आहे अशी प्रतिक्रिया काश्मिर श्रीनगर येथील हॉटेल व्यावसायिक शबीर खान यांनी व्यक्त केली.