ठाणे : शहरात रविवारी निघालेल्या श्रीराममंदिर अक्षत कलश यात्रेनंतर, आता श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणे शहरातील ८ लाख घरांमध्ये संपर्क साधण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली आहे. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा गृह संपर्क अभियान विभागामार्फत पुढील काही दिवसांत ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. दरम्यान या संपर्क अभियानात भाजपाचे कार्यकर्तेही सहभागी होतील अशी माहिती पक्षाचे ठाणे शहर प्रमुख संजय वाघुले यांनी दिली. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा गृह संपर्क अभियानाचे प्रमुख विवेक कुलकर्णी व सहप्रमुख अविनाश मुंढे यांनी या गृह संपर्क अभियानाची घोषणा केली.
ठाणे शहरातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनपासून ग्रामदैवत कौपिनेश्वर मंदिरापर्यंत काढलेल्या अक्षत कलश यात्रेत रविवारी मोठ्या संख्येने ठाणेकर सहभागी झाले होते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक यांच्याबरोबरच भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी यांनीही सहभाग घेतला. या यात्रेच्या माध्यमातून ठाणे शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचून श्री रामाच्या चरित्राचे जागरण करण्याबरोबरच रामदूत होऊन घराघरांपर्यंत अक्षत दिले जाणार आहे. त्याचबरोबर जातीवाद, भाषावाद आणि प्रांतवादापासून सर्वांना मुक्त करून सनातन वैदिक धर्माची ओळख करुन दिली जाणार आहे. त्यानुसार शहरातील आठ लाख घरांपर्यंत पोहोचून अक्षत, श्रीराममंदिराचे चित्र आणि पत्रक दिले जाईल. त्याचबरोबर अयोध्येतील श्री राम मंदिराच्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठाच्या वेळी आपल्या भागातील मंदिरात सकाळी ११ ते दुपारी एकपर्यंत रामनाम जप, १०८ वेळा हनुमान चालिका, सुंदरकांड आणि महाआरतीत सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल.
हेही वाचा – ठाण्यात पाणी वितरण सुधारणा प्रकल्प खर्चात वाढ
२२ जानेवारी रोजी सायंकाळी प्रत्येक घराबाहेर रांगोळी काढून पाच पणत्या लावाव्यात, उपवास ठेवावा, फटाके फोडून दिवाळीप्रमाणे आनंद साजरा करावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील २५७ भागांतील मंदिरांमध्ये संतांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती अभियानाचे प्रमुख विवेक कुलकर्णी व सहप्रमुख अविनाश मुंढे यांनी दिली.