कल्याण- डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणांचा अहवाल आम्हाला कल्याण डोंबिवली पालिकेतून मिळाला की त्या अनुषंगाने आम्ही या बांधकामांची बनावट कागदपत्रे, महारेराकडून बनावट नोंदणी क्रमांक मिळविताना वापरलेली पध्दत, या बांधकामातील विकासक, वास्तुविशारद, जमीन मालक, मध्यस्थ याशिवाय, ही बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत उभी राहिली. त्यांनी कोणती कार्यवाही केली, याची चौकशी करणार आहोत, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ
कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून यापूर्वी आम्हाला डोंबिवलीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणांसंबंधी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ती माहिती त्रोटक असल्याने आम्ही पालिकेला सहा तक्त्यामध्ये माहिती पाठविण्यासाठी सांगितली आहे. त्या तक्त्यामधील माहितीप्रमाणे या बेकायदा बांधकाम प्रकरणाची योग्य चौकशी करणे शक्य होईल. या तक्त्यामधील माहितीप्रमाणे आम्हाला अहवाल मिळाली की आम्ही प्रत्यक्ष चौकशीला सुरूवात करू, असे ‘ईडी’च्या उच्चपदस्थाने सांगितले.
हेही वाचा >>>राडारोडा उचलण्यासाठी विशेष पथके तयार करा, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश
डोंबिवलीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष तपास पथक चौकशी करत आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या बांधकामांसाठी विकासकांनी पैसा कोठुन उभा केला आहे. या मिळकतींमधून मिळालेला पैसा पुन्हा कोठे वापरला आहे. हे व्यवहार करताना शासनाचा महसूल, प्राप्तिकर विभाग, वस्तू व सेवा कर, पालिकेचे अधिभार वेळेवर भरला आहे की नाही याची चौकशी केली जाईल, असे उच्चपदस्थ म्हणाला.
एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे शहरात उभी राहत असताना कल्याण डोंबिवली पालिकेतील अतिक्रमण नियंत्रण विभागाने ही बांधकामे योग्य कार्यवाही करुन का तोडली नाहीत. त्यांना कोणी अभय दिले. या इमारतीत रहिवास होईपर्यंत पालिका अधिकारी गप्प का बसले, या सर्व प्रकरणाची बारकाईने चौकशी केली जाणार आहे, असे वरिष्ठ ‘ईडी’ अधिकारी म्हणाला.६५ बेकायदा प्रकरणात पोलीस चौकशी करत होते, तोपर्यंत भूमाफिया निर्धास्त होते. या प्रकरणात ईडीने उडी घेतल्या पासून भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीने हैराण झालेले भूमाफिया आता ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागेल या भीतीने घाबरुन गेले आहेत. या बांधकामांना आसरा देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असल्याचे कळते.
पालिकेच्या अहवालाला विलंब
पालिकेचा अहवाल तयार होऊन एक महिना झाला तरी पालिकेकडून ईडीला अहवाल पाठविण्यात येत नसल्याने या प्रकरणातील तक्रारदार वास्तुविशारद संदीप पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. ईडीला ६५ बेकायदा बांधकामांची समग्र माहिती देण्यापेक्षा ही बांधकामे आम्ही कशी पाडली आणि या प्रकरणातील बांधकामधारक एवढीच माहिती ईडीला देऊन या प्रकरणातून पालिका अधिकाऱ्यांना वाचविता येईल का, या दिशेने प्रशासनात हालचाली सुरू असल्याचे कळते. तक्रारदार संदीप पाटील यांनीही अशा हालचाली होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पालिका अधिकारी मात्र सुयोग्य अहवाल लवकरच ईडीला पाठविणार आहोत, असे सांगत आहेत.
हेही वाचा >>>ठाण्यात होणार महिला आयपीएल स्पर्धेचा लिलाव?, दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह व्यवस्थापनाकडे एमसीएकडून विचारणा
‘ईडी’ला दाखल करावयाच्या पालिकेच्या अहवालातील सहा तक्त्यांमध्ये जमीन मालक, भूमाफिया, वास्तुविशारद यांचे पत्ते, मोबाईल क्रमांक, बांधकाम कधी उभे राहिले. काय कारवाई केली अशी समग्र माहिती असल्याचे कळते.प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ६५ बेकायदा इमारती शोधणारे कर्मचारी अहवालात कोणतेही फेरबदल करू नयेत अशा मागणीचे आहेत. काही अधिकारी फेरबदलासाठी धावपळ करत असल्याचे समजते. पालिकेकडून ईडीला समग्र माहिती देण्याची शक्यता नसल्याने तक्रारदार संदीप पाटील, माहिती कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी पालिका हद्दीतील दोन लाख ३५ हजार बेकायदा बांधकामे, मागील २५ वर्षात बेकायदा बांधकामांच्या चौकशीसाठी स्थापन झालेले काकोडकर अहवाल, पटवर्धन समिती अहवाल, न्या. अग्यार अहवाल, नागनुरे समिती अहवाल ईडी अधिकाऱ्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाठविले आहेत. डोंबिवली, कल्याण मधील बेकायदा बांधकामांमध्ये भूमाफियांना असलेला राजकीय पाठिंबा, पालिका, पोलीस अधिकाऱ्यांचा या बांधकामांमधील सहभाग अशी इत्यंभूत माहिती ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे.
“पालिकेचा अहवाल ईडी कार्यालयात दाखल झाला की या प्रकरणातील सत्यता मांडण्यासाठी आपण पुन्हा एकदा ईडी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत. यापूर्वीच आपण याप्रकरणातील सहभागी पालिका, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची नावे ईडीला दिली आहेत.”-संदीप पाटील,तक्रारदार, डोंबिवली