ठाणे : बेकायदेशिररित्या रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांवर ठाण्यात टोईंग वाहनांद्वारे कारवाई करण्यात येते. टोईंग वाहनांच्या कारवाईवरून अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. करार संपल्यानंतर ठाणे पोलिसांनी करार करून ती वाहने पुन्हा सुरू केली होती. परंतु कराराबाबत विविध आक्षेप आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चारच दिवसांत टोईंगची कारवाई बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. दुसरीकडे टोईंग कारवाई बंद असल्याने वाहन चालकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्याकडेला बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर ठाणे पोलिसांकडून टोईंग वाहनांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. टोईंग वाहनांच्या कंत्राटदारांकडून अनेकदा नियमबाह्य पद्धतीने वाहने उचलली जातात. त्यामुळे टोईंग वाहनांवर काम करणारे कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवित असतात. अनेकदा हे प्रकरण शिवीगाळ आणि हाणामारी पर्यंत येत असते. त्यासंदर्भातील चित्रीकरण देखील विविध समाजमाध्यमांवर प्रसारित आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील टोईंग व्हॅनचे करार दरवर्षी केले जातात. आयुक्तालय क्षेत्रात अशापद्धतीने सुमारे ३० टोईंग वाहने धावतात. या वाहनांचा टोईंग वाहनांचा करार नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुमारे महिनाभर त्यांस मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीची तारीख उलटल्यानंतर ठाणे स्थित अजय जेया यांनी टोईंग वाहनाद्वारे केली जाणारी कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
टोईंग वाहने बंद असल्याने नागरिकांना कारवाईतून दिलासा मिळाला असला तरी २३ जानेवारीला पोलिसांनी पुन्हा नव्याने कंत्राटी करार केला आहे. त्यानंतर ३० जानेवारीला टोईंग वाहन सुरू झाल्या होत्या. पंरतु चारच दिवसांत टोईंगची वाहतुक बंद करण्याची नामुष्की वाहतुक पोलिसांवर आली. कराराची कागदपत्रे ठाणे पोलिसांनी संकेतस्थळावर सामाविष्ट केली नव्हती. याविषयी पुन्हा जेया यांनी आक्षेप घेतला. तसेच टोईंग वाहनांसाठी कोणतीही निविदा काढली गेली नाही असा आरोपही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी टोईंग वाहने सुरू झाली होती. परंतु कारणास्तव ती बंद करण्यात आली आहे. पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.
ठाणे पोलिसांनी निविदा प्रक्रिया पार पाडली नसतानाही टोईंग वाहनांचा करार केला आहे. हे नियमबाह्य आहे. तसेच नव्या कराराची माहिती सोमवारपर्यंत संकेतस्थळावर सामाविष्ट केली नव्हती. तक्रारी केल्यानंतर मंगळवारी संबंधित करार संकेतस्थळावर सामाविष्ट करण्यात आला. टोईंग वाहनांच्या गैरप्रकाराविषयी जनआंदोलन करणार आहे. – अजय जेया, ठाणे.