ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नालेसफाई तसेच रस्ते कामांच्या पाहाणी दौऱ्याला दोन दिवस होत नाही तोच भाजपच्या नेत्यांनी शहरातील नालेसफाईची पाहाणी करून पोलखोल केली आहे. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात डावलण्यात आल्याने भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ भाजप नेत्यांनी केलेल्या दौऱ्यामध्ये त्यांना अनेक नाल्यांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिग साचल्याचे दिसून आले असून याच मुद्द्यावरून त्यांनी पालिकेच्या कारभारावर टिकेचे आसुड ओढले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा पावसाळ्यापुर्वीच्या नालेसफाई कामांना उशीराने सुरूवात झाली आहे. त्यातच कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय महिला आणि पुरुष कर्मचारी नालेसफाईची कामे करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. तसेच अनेक भागांमध्ये नालेसफाईची कामे प्रभावीपणे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. या मुद्द्यावरून पालिकेच्या कारभारवर टिकाही होत आहे. असे चित्र असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नालेसफाईच्या कामांचा पाहाणी दौरा केला. यावेळी त्यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी मदत क्रमांक सुरू केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यानंतर म्हणजेच बुधवारी सायंकाळी भाजपचे आमदार संजय केळकर आणि भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शहरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यात त्यांना माजिवडे येथील नाला कचऱ्याने तुंबला असल्याचे आढळून आले. रुस्तमजी गृहसंकुलाजवळून जाणारा आणि केव्हीला परिसरातील नाला याठिकाणीही अशीच काहीशी परिस्थिती त्यांना दिसून आली. राबोडी, कैसरमील, हरदासनगर आणि वृंदावन येथेही अशीच परिस्थीती असल्याचे त्यांना दिसून आले आहे.
हेही वाचा >>>जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आरोपपत्र
पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाई झाली नसल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. तसेच शहरात नालेसफाईची कामे ७० टक्के पूर्ण झाल्याचा पालिकेने केलेला दावा खोटा आहे. ठाणे महापालिकेने नालेसफाईसाठी १० कोटींचा निधी दिला आहे. परंतु सध्याची नाले सफाई पाहता ठाणेकरांच्या या पैशांची खुलेआम लूट होत आहे, असा आरोप आमदार केळकर यांनी यावेळी केला. एकीकडे आयुक्त अभिजित बांगर प्रयत्न करत असले तरी ठेकेदार आणि अधिकारी त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ठाणे महापालिकेने नाले सफाईच्या तक्रारींबाबत हेल्पलाईन जारी केली आहे. नागरीकांनी पुढाकार घेऊन याबाबत तक्रारी कराव्यात, अन्यथा पावसाळ्यात मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन करत अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भ्रष्टाचाराचे नमुने आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.