ठाणे : गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार वाढू लागले असून या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत शहरातील सर्वच वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांना काँक्रीटमुक्त करण्याचे आणि या कामाचा प्रभाग समितीनिहाय अहवाल ३१ जुलैपर्यत सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाला दिले.
ठाणे शहरात ७ लाख २२ हजार इतके वृक्ष आहे. त्यात ३० टक्के विदेशी तर, ७० टक्के देशी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अशा घटनांमध्ये जीवित व वित्तहानी होत आहे. अशाचप्रकारे गेल्यावर्षी कोलबाड भागात वृक्ष पडून अर्पिता वालावलकर यांचा मृत्यु झाला तर, अमोल रांधावे हे जायबंदी झाले. या दोघांना आर्थिक मदत किंवा त्यांच्या वारसाला पालिकेत नोकरी मिळावी अशी मागणी करणारी याचिका अर्पिता यांचा मुलगा प्रतिक वालावकर आणि ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान काँक्रीटच्या फासात अडकलेल्या वृक्षांचे परिक्षण करण्यात येत असल्याचा दावा उच्च न्यायालयात करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी पोलखोल केली होती.
जोशी यांनी काँक्रीटच्या वेढ्यातील वृक्षांची छायाचित्रे सादर करताच न्यायालयाने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या सभोवती असलेले सिमेंट काँक्रीट काढून टाकण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीची बैठक घेतली. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रात जवळजवळ ४०० कि.मी रस्त्याचे जाळे पसरलेले आहे. या रस्त्यांच्या दुतर्फा शास्त्रोक्त पध्दतीने वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे ७ हजार ३९६ वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग समितीनिहाय वृक्षांचे सर्व्हेक्षण करुन वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा आणि वृक्षांभोवती असलेले काँक्रीट तात्काळ हटविण्यात यावे. वृक्षांभोवती तीन बाय तीन फूटाची जागा मोकळी ठेवून त्यात माती राहील, या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाला दिल्या आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवलीत एमआयडीसीची जलवाहिनी फुटली
महापालिकेच्या वास्तूच्या आवारात असलेल्या वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढण्यात यावे तसेच इतर शासकीय इमारतीच्या आवारात असलेले वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढून टाकण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करुन त्याची तातडीने अंमलबजावणी होईल या दृष्टीनेही कार्यवाही करावी. शहरातील खाजगी गृहसंकुलाच्या आवारातील वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढण्यासाठी सुचना द्यावात आणि प्रभागसमितीनिहाय याची माहिती संकलित करण्यात यावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
प्रत्येक प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंत्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून अहवाल तयार करुन यामध्ये रस्त्याचे नाव, एकूण वृक्ष, त्यामध्ये काँक्रीटमुक्त करण्यात आलेल्या वृक्षांची संख्या, प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या वृक्षांची संख्या अशी माहिती देण्यात यावी. हा अहवाल ३१ जुलैपर्यत सादर करावा, अशा सुचना आयुक्त बांगर यांनी दिल्या आहेत. हे काम करताना या ठिकाणी असलेल्या विविध सेवा वाहिन्यांना बाधित होणार नाहीत या दृष्टीनेही दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पदपथावरील वृक्षांभोवती असलेले काँक्रीट काढून टाकल्यानंतर ही जागा पूर्ववत करण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात यावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.