पावसामुळे खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती. आता पावसाने विश्रांती घेतल्याने प्रवासाती कसरत कमी झाली असली तरी खड्डे भरण्याच्या कामात मातीचा भरमसाठ वापर केल्याने आता रस्त्यांची धुळधाण झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरही धुळधाण झाली असून प्रवाशांसह आसपासच्या रहिवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागतो आहे. उल्हासनगरातील अनेक रस्त्यांवर सध्या हेच चित्र आहे.
गेल्या काही वर्षात कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था होते आहे. यंदाच्या वर्षातही म्हारळपाडा ते कांबा ते पाचवामैल या भागात या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे तासनतास वाहतूक कोंडी आणि अपघातांचा प्रवास वाहनचालकांना करावा लागत होता. यावर लोकसत्ता ठाणेमधून सातत्याने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या महामार्गावर वरप, कांबा या भागात असलेल्या शाळा आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे भरण्याचे काम अविरत सुरू ठेवले. माती, खडी, सिमेंटचे मिश्रण टाकून हे खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे आता रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुळ उडते आहे. खड्ड्यातील माती, खडी उखडू लागली आहे. त्यामुळे वाहने आणि त्यातही अवजड वाहने येथून प्रवास केल्यानंतर ही माती मोठ्या प्रमाणावर उडते आहे. ही धुळीने दुचाकी, रिक्षाचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मुखपट्टीशिवाय प्रवास करणे अशक्य झाले आहे. तर दुचाकी, सायकलवरून प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार यांच्या कपड्यांवर धुळीचा थर साचतो आहे. त्यामुळे मनस्ताप होतो आहे. महामार्गाशेजारी राहणाऱ्या गृहसंकुलांतील, घरांतील नागरिकांना, दुकानदारांना या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे आधी खड्ड्यांमुळे तर आता धुळीची बाधा होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ देत आहेत.
राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच उल्हासनगर शहरातील बहुतांश रस्त्यांवर धुळीचा त्रास होतो आहे. कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग आणि कल्याण बदलापूर राज्यमार्गाला जोडणारा जोड रस्त्यावर धुळीचे लोट पहायला मिळत आहेत. कल्याण बदलापूर राज्यमार्गावर विविध चौकांमध्ये आज खड्ड्यातील माती सुकल्याने धुळ उडते आहे. त्याचा वाहनचालकांना त्रास होतो आहे.