कोयना प्रकल्पबाधितांसाठी राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा काम जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात हाती घेतले होते. ठाणे तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपरी गोठेघर, डायघर, भंडार्ली आणि वालिवली येथील राखीव जमिनीवर मागील तीस वर्षांपासून भूमाफियांनी कब्जा केलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकाम जिल्हा प्रशासनानाने दोन दिवसांची धडक मोहीम राबवित हटविले आहे. यात सुमारे वीस एकर जागेवरील १३ मोठाली भंगाराची गोदामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या शेतजमिनीचे गणेशोत्सवानंतर बाधितांना हस्तांतरण करण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा पुनर्वसन विभागाच्या वतीने मागील आठवड्यात स्थानिक यंत्रणांना कोयना प्रकल्प बाधितांच्या राखीव जागेवरील अतिक्रम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार स्थानिक तहसीलदार आणि अधिकारी वर्गाने शीळ डायघर येथील पोलिसांच्या मदतीने अनधिकृत बांधकाम हटविण्याचे काम हाती घेतले होते. यामध्ये पाहिल्या टप्प्यावर जिल्हा प्रशासनाने ठाणे तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपरी गोठेघर, डायघर, भंडार्ली आणि वालिवली येथील वीस एकर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. यामध्ये भंगाराची १३ मोठाली गोदामे प्रशासनाने जमीनदोस्त केली आहेत. यामुळे कोयना प्रकल्प बाधितांना हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर गेल्या तीन दशकांपासून राजरोसपणे अनधिकृत गोदामे उभारून आणि त्यातून उत्पन्न कमावणाऱ्या गोदाम मालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अतिक्रमण हटविलेल्या या शेतजमिनीचे प्रकल्प बाधितांना गणेशोत्सवानंतर हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. तर उर्वरित जागेवरील अतिक्रम हटविण्याची मोहीम जलदगतीने आणि टप्प्याटप्प्याने पार पडणार असल्याची माहिती जिल्हा पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुरबाडच्या जागेवर अद्याप तोडगा नाही
ठाणे आणि भिवंडी तालुक्याबरोबरच मुरबाड तालुक्यात देखील कोयना प्रकल्प बाधितांसाठी काही हेक्टर शेतजमीन राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र शासनाने राखीव म्हणून घोषित केलेली ही जागा मागील अनेक दशक ग्रामस्थ राखत असल्याने त्यांनी ती जागा देण्यात विरोध केला आहे. दोन महिन्यांपूर्वी जागेची मोजणी करण्याकरिता गेलेल्या अधिकारी वर्गाला देखील ग्रामस्थांनी माघारी पाठवले होते. अद्यापही ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. एकीकडे ठाणे तालुक्यातील अतिक्रमण हटवून बाधितांना जागा देण्याच्या जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र मुरबाड तालुक्यातील राखीव जागा प्रश्नाविषयी तोडगा काढण्यात प्रशासनाला अदयाप यश आले नाही.

ठाणे तालुक्यात येणाऱ्या चार गावांतील कोयना बाधितांच्या राखीव जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. गणेशोत्सवानंतर सर्व शासकीय प्रकिया पूर्ण करून बाधितांना त्यांच्या हक्काची जागा देण्याची कार्यवाही सुरु करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.– युवराज बांगर, तहसीलदार, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After three decades encroachment on 20 acres of land in thane taluka was removed amy