अंबरनाथ : अंबरनाथ शहराला सुमारे १२० दशलक्ष लीटर पाणी मिळते. मात्र तरीही शहरातील विविध भागात पाणी टंचाई भेडसावते आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या ढिसाळ कारभारावर नागरिकांत संताप असतानाच सोमवारी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या मांडला. येत्या दोन दिवसात शहरात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी डॉ. किणीकर यांनी राज्याच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैसवाल यांच्याकडे केली. त्यामुळे सत्ताधारी आमदारांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याने जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या वेगाने वाढते आहे. या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुरवठा दोन्ही शहरांना केला जातो. बारमाही उल्हास नदीमुळे दोन्ही शहरांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील विविध भागात कायम पाणी टंचाईसदृश्य परिस्थिती असते. अंबरनाथ शहरासाठी दररोज १२० दशलक्ष लीटर पाणी उचलले जाते. मात्र तरीही शहरात पाणीटंचाई असल्याने नागरिकांत प्राधिकरणाच्या कारभारावर रोष आहे. नागरिकांच्या या रोषाचा सामना लोकप्रतिनिधींनाही करावा लागतो. सोमवारी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
जीवन प्राधिकरणाच्या अभय योजनेतून शहरातून १२ कोटी ९७ लाख इतकी वसुली करण्यात आली आहे. तसेच पाण्याची बिले देखील वेळेवर पाठवली जात असून नागरिकांना मात्र नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ही ठिय्या मांडण्याची वेळ आल्याचे यावेळी डॉ. किणीकर यांनी सांगितले. शहरात तीव्र पाणी टंचाई असताना देखील शहरातील टँकर माफियांना मात्र नियमित लाखो लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध होतेच कसे, असा सवालही आमदार डॉ. किणीकर यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या हक्काचे पिण्याचे पाणी पळवणाऱ्यांवर तसेच पाणी चोरीवर दुर्लक्ष करणाऱ्या संबधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैसवाल यांच्याकडे केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याने प्राधिकरणाच्या अभियंत्यांना कुणाचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.