एकमेकांच्या हातावर बॅण्ड बांधून किंवा आपले नाव रंगवून मैत्रीदिन साजरा करण्याचा ट्रेंड महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये वाढत असला तरी या दिवसाचे निमित्त साधून समाजाच्या तळागाळातील, वंचित, दुर्लक्षित घटकांशी मैत्रीचे बंध जुळवण्याचे प्रयत्नही होऊ लागले आहेत. कल्याणमधील अग्रवाल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रविवारी अशाच पद्धतीने मैत्रीदिन साजरा करत आधारवाडी येथील कातकरी वस्तीत वाचनालय उभारले आहे. यानिमित्ताने ‘अग्रवाल’च्या विद्यार्थ्यांचा येथील कातकरी समाजाशी संवाद घडून आलाच; पण त्याचबरोबर या वस्तीतील मुलांची पुस्तकांशी मैत्री होण्याचा मार्गही मोकळा झाला.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरुंगाच्या मागच्या बाजूस आदिवासी आणि कचरा वेचकांची वस्ती आहे. तीस घरांनी मिळून बनलेल्या या वस्तीत एकूण ४५ शालेय विद्यार्थी राहतात. अग्रवाल महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळांच्या विद्यार्थ्यांतर्फे वस्तीतील समाजमंदिराच्या एका मोकळ्या जागेत शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन वाचनालय सुरू करण्यात आले आहे. कातकरी वस्तीतील या वाचनालयाचे ‘अण्णा भाऊ साठे वाचनालय’ असे नामकरण करण्यात आले आहे. प्राथमिक स्वरूपात या वाचनालयात विविध प्रकारची ६० पुस्तके ठेवण्यात आली आहेत.
महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या एकूण २० विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या सूर्यकांत कोळी आणि मिलिंद कदम या दोन माजी विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी नियमितपणे शिक्षणवर्ग चालविण्यात येतात. संजय कशिवले, तृशांत जाधव, रवी घुले आणि वैभव जाधव या  विद्यार्थ्यांचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग आहे. कातकरी वस्तीत वाचनालय सुरू करण्यासोबतच अन्य उपक्रम राबवण्यात येत असून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता मन्ना यांचे या उपक्रमांना सहकार्य लाभले आहे, अशी माहिती या उपक्रमांच्या मार्गदर्शक प्रा. मीनल सोहोनी यांनी दिली.

Story img Loader