डोंबिवली परिसरातील वीज ग्राहकांना महावितरणकडून वाढीव वीज देयके पाठवण्यात आल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. महावितरणच्या वीज देयक भरणा कार्यालयातून ‘प्रथम वीज देयक भरा मग बघू’ अशी उत्तरे देण्यात येत असल्याने नाराजी पसरली आहे. वाढीव वीज देयके कमी करा, अशी मागणी येथील राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे.   
दरमहा ५०० ते एक हजार रुपयांच्या घरात येणारे वीज देयक थेट दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत येऊ लागल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. वीज दरवाढ झाली नाही. युनिट दर तेच असताना वाढीव देयक कशासाठी पाठवले जात आहे याचे स्पष्टीकरण महावितरण, शासनाकडून देण्यात येत नसल्याने रहिवासी संभ्रमात आहेत.
वाढीव देयके तातडीने कमी करावीत. देयक वाढीव पाठवले असेल तर त्याची कारणे द्यावीत. त्यानंतरच वीज देयक वसुली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी महावितरणकडे केली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र धोरणात्मक निर्णयाप्रमाणे वीज देयके पाठवण्यात येत आहेत, असे स्पष्टीकरण दिले. गेल्या वर्षी जो भार वाढणार होता. तो शासनाकडून महावितरणला मिळणार होता. पण नवीन भाजप सरकारने महावितरणाला अनुदान देण्यास नकार दिल्याने ग्राहकांवर विजेचा बोजा पडत आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.