उंबार्लीतील उत्खनन रोखण्याची मागणी
डोंबिवली : डोंबिवली परिसरातील रहिवाशांना मोकळा श्वास घेण्यासाठी असलेली आणि वनश्रीने नटलेली या भागातील एकमेव उंबार्ली टेकडी शासनाच्या गृहनिर्माणाशी संबंधित संस्थेने घर बांधण्यासाठी पोखरण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाची ही जमीन असूनही ही यंत्रणाही याविषयी मौन बाळगून असल्याने डोंबिवली परिसरातील निसर्गप्रेमी रहिवाशांनी मंगळवारी सकाळी एकत्र येत टेकडीच्या माथ्यावर एकत्र येऊन टेकडी बचाव आंदोलन केले.
टेकडीवरील उत्खनन सुरूच राहिले तर यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निसर्गप्रेमी मंडळींनी दिला. या आंदोलनात शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण सहभागी झाले होते. वन विभाग, शिक्षण संस्था, शहर परिसरातील सामाजिक, पर्यावरणप्रेमी संस्थांनी मागील अनेक वर्षांत सुमारे ४० हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. ही झाडे प्रत्येक संस्थेने दत्तक घेऊन त्यांचे संगोपन सुरू केले आहे. या झाडांमध्ये काजू, आवळा, कदंब, आंबा, चिकू अशा अनेक प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. डोंबिवली शहरवासीयांना रिजन्सी गृहनिर्माण संस्थेमागील दावडी, गोळवली, उंबार्ली भागातील १६८ एकर क्षेत्रात पसरलेल्या निसर्गसंपदेने भरलेल्या उंबार्लीच्या टेकडय़ा हा एकमेव आधार आहे. दररोज सकाळी सुमारे ५०० हून अधिक आणि संध्याकाळी २०० हून अधिक रहिवासी या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. डॉक्टर, घर ते टेकडी असा येऊन-जाऊन १० किमीचा टप्पा दररोज पार करणे हा उत्तम व्यायाम ठरतो, असे येथे नियमित येणारे विक्रांत शिंदे यांनी सांगितले. टेकडय़ांवरील भागात पाण्याचे डोह, पायथ्याशी तलाव असल्याने येथे वेगळ्या प्रकारचे स्थानिक, स्थलांतरित पक्षी पाहण्यास मिळतात. पावसाळ्यात टेकडीवर विविध प्रकारच्या संस्था, शाळाचालक मुलांना घेऊन वृक्षारोपण करण्यासाठी येतात. झाडे लावण्याची स्पर्धा येथे पावसाळ्यात सुरू असते. ही बहरलेली झाडे फुलविण्यासाठी निसर्गप्रेमी मंगेश कोयंडे आणि त्यांचे साथी दररोज पाऊस पडेपर्यंत टेकडीवरील झाडांना डोहातील, डबक्यातील पाणी ड्रममध्ये आणून घालतात. स्वयंस्फूर्तीने हे काम चालू आहे.
ही डंवरलेली वनसंपदा गरिबांना घरे देण्याच्या नावाखाली पोखरून काढण्याचे काम गरिबांसाठी घरे बांधणाऱ्या एका शासकीय संस्थेने सुरू केले असल्याची टीका निसर्गप्रेमी करीत आहेत. या संदर्भात संबंधित यंत्रणा, वन विभागाला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने रहिवासी आणि निसर्गप्रेमींनी मंगळवारी सकाळी उंबार्ली टेकडीवर एकत्र येऊन निषेध आंदोलन केले. शासनाच्या गृहप्रकल्पाला विरोध नाही, पण हे करताना टेकडीच्या एक दगड, कोपऱ्यालाही धक्का लागता कामा नये. या ठिकाणी डंवरलेली वनसंपदा कायम राहिली पाहिजे. वन विभागाने या वनसंपदेचे रक्षण केले पाहिजे अशा मागण्या करीत रहिवाशांनी निदर्शने केली. मानपाडा पोलीस, म्हाडाचे विभाग अभियंता, उपअभियंता, गृहप्रकल्प उभारणाऱ्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रकल्प प्रमुख, वन विभागाचे अधिकारी आंदोलकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी उपस्थित होते.
प्रस्तावित जागेतच इमारत बांधकाम
भूमिअभिलेख विभागाकडून जमिनीची मोजणी करून शासनाकडून जेवढी सरकारी जमीन म्हाडाला दुर्बल घटकांना घरे बांधून देण्यासाठी उपलब्ध झाली आहे, तेवढय़ाच जागेत इमारती बांधण्यात येणार आहेत. सरकारी जमीन आणि वन जमिनीच्या हद्दी लगत असल्याने निसर्गप्रेमी मंडळींचा गैरसमज झाला आहे. घर बांधण्यासाठी लागणारी यंत्रणा, वाहने, कामगार निवासासाठी पुरेशी जागा नसल्याने प्रकल्पाच्या बाहेरील निसर्गप्रेमींचा आक्षेप असलेली तीन ते चार एकर जमीन तात्पुरत्या वापरासाठी ताब्यात घेतली आहे. ही जमीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत करून तेथे हरितपट्टा म्हाडाकडून विकसित केला जाणार आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.