ठाणे : टाटा मोटर्स लिमिटेड आणि टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला असून या करारामुळे ग्राहकांना टाटा मोटर्सच्या पसंतीच्या प्रवासी आणि वीजेवरील वाहने खरेदीसाठी सहज वित्तपुरवठ्यासह मालकी हक्क मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.
टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड ही भारतातील आघाडीची बहुराज्यीय सहकारी बँक असून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये १४९ शाखांचे मजबूत जाळे आहे. बँकेचा एकूण व्यवसाय २२,००० कोटींहून अधिक असून, ग्राहकांना दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. प्रवासी आणि वीजेवरील वाहन खरेदीसाठी सुलभ वित्तपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेड आणि टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड यांनी सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारावर टाटा मोटर्स आणि टीजेएसबी सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. ग्राहकांचे समाधान आणि वाहन खरेदीच्या प्रक्रियेला सुलभ बनवण्याच्या दृष्टीने दोन्ही संस्थांचे हे व्यावसायिक संलग्नत्व महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात, टीजेएसबी सहकारी बँकेने आपल्या १५ शाखांमध्ये टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून या प्रदर्शनात ठेवलेल्या वाहनांद्वारे प्रत्यक्ष वाहन चालविण्याच्या अनुभवाची सुविधा ग्राहकांकरीता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या करारामुळे आम्ही ग्राहकांना दर्जेदार सेवा प्रदान करता येईल आणि बँकेच्या व्यवसाय वृद्धीस वेग येईल. ग्राहकांचा विश्वास आणि समाधान हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असून, या व्यावसायिक सहयोगामुळे आम्ही ग्राहक-केंद्रित सेवांमध्ये अधिक भर टाकत आहोत. – निखिल आरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीजेएसबी बँक