ठाणे : भात पिकानंतर ओस पडणाऱ्या कोकण विभागातील शेतीला दुसऱ्यांदा लागवडीसाठी तयार करणाऱ्या कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी केली आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात येत आहे. यंदा सुमारे ५ हजार ६८२ हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच २ हजार ९४० हेक्टरवर कडधान्यांची लागवड करण्यात येणार आहे. तर उर्वरित क्षेत्रावर हरभरा, गळीत धान्य, तृणधान्य यांची लागवड करण्यात येणार आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या कापणीनंतर हिवाळ्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांना रब्बी हंगामातील पीक म्हणून ओळखले जाते. ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिके घेतली जातात. त्यात प्रामुख्याने ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. उर्वरित क्षेत्रात नाचणी, वरी, कडधान्ये आणि बांधावर घेतल्या जाणाऱ्या तुरीचा समावेश असतो. रब्बी हंगामात तुलनेने फार कमी प्रमाणात पिके घेतली जातात. त्यामुळे रब्बीच्या हंगामातही दुबार पिके घेण्याकरिता शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर यावर्षी रब्बी उन्हाळी हंगामात कडधान्य पिकाबरोबरच भाजीपाला क्षेत्र वाढीसाठीही प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. याचा फायदा यंदाच्या भातशेतीला देखील झाला होता. यामुळे यंदा रब्बीच्या पिकाला देखील उत्तम जमीन तयार आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या रब्बी हंगामाला उत्तम वातावरण असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक लागवडीत काहीशी वाढ करण्यात आल्याचे ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
गतवर्षी रब्बी हंगामात ५ हजार १६४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. तर यंदा रब्बी हंगामामध्ये एकूण ५ हजार ६८२ हेक्टर रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यावर्षी कृषी विभागाकडून एकूण ८८ क्विंटल मसूर बियाणे मिनी किट वाटप केले आहे. त्यानुसार १७६ हेक्टर वर मसूर लागवड होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
एकूण लागवड नियोजन ( हेक्टर मध्ये )
हरभरा लागवड – २ हजार ४५५
कडधान्य – २ हजार ९४० हेक्टर
तृणधान्य – २१७ हेक्टर
गळीत धान्य – ७० हेक्टर