ठाणे : लाभार्थी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने मिळावा यासाठी गेले काही महिन्यांपासून केंद्र शासनाच्या धर्तीवर ॲग्रीस्टॅक योजना जिल्हा स्तरावर राबवली जात आहे. या योजने मार्फत शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र देण्यात येते असून या कार्डमध्ये त्यांच्या जमिनीच्या नोंदणीसह हे कार्ड आधार कार्डसोबत जोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे उपयोगी ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील ६७ हजार ९८२ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंद केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

भारत हा कृषी प्रधान देश असून देशातील ५५ टक्के शेतकरी हे कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीने आणि परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन योजना राबविण्यात येते. यापुढे या नोंदणीच्या आधारेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय या नोंदणीमुळे इतर मदत, नुकसान भरपाई मिळवणेही शेतकऱ्यांना सोपे होणार आहे. ठाणे जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मानच्या लाभार्थींची संख्या १ लाख ३१ हजार ७५७ इतकी आहे. यापैकी ६७ हजार ९८२ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेसाठी नोंदणी केली आहे. तर, पीएम किसानच्या लाभार्थींपैकी ६४ हजार ८२३ शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केलेली नाही. राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकर ही नोंदणी करावी, अन्यथा पीएम किसानचे पैसे मिळण्यात अडचणी निर्माण होतील, असे आवाहन जिल्हा कृषी विभागातून करण्यात आले आहे.
नोंदणी कशी कराल ?

ॲग्रीस्टॅक योजनेच्या नोंदणीसाठी सातबारा, आधारकार्ड आणि आधार कार्ड लिंक असलेला दुरध्वनी क्रमांक हे कागदपत्रे आवश्यक आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांनी तत्काळ त्यांच्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क करावा. संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला तरी शेतकऱ्यांना अवघ्या दोनच मिनिटांत शेतकरी ओळख नंबर मिळवणे शक्य होते. त्यानंतर ॲग्रीस्टॅक हे कार्ड तयार करता येते. यामुळे योजनांचा लाभ देताना, अचडण येणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी कार्ड घेणे गरजेचे आहे, अशी माहिती संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
आता पर्यंत तालुकानिहाय ॲग्रीस्टॅक योजनेसाठी झालेली नोंदणी

तालुका शेतकरी नोंदणी
अंबरनाथ ६, ४२१
भिवंडी १७, ६३१
कल्याण ७, ७९५
मुरबाड १४,२५६
शहापूर २०,५०३
ठाणे १,३४७
उल्हासनगर २९
एकूण ६७,९८२

शेतीशी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणणारी अॅग्रीस्टॅक ही प्रणाली असून, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली नाही त्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन आपले शेतकरी ओळखपत्र तयार करावे. कुटुंबातील प्रत्येक सातबारा धारक सदस्यांनी यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. रामेश्वर पाचे , जिल्हा कृषी अधीक्षक ठाणे.