वसई-विरार महापालिकेचा निर्णय; भाजीपाला, फळे यांचे जतन
वसई : वसईतील शेतमालाचे संरक्षण व्हावे यासाठी महापालिकेतर्फे ‘अॅग्रो अॅम्ब्युलन्स’ (कृषी मालवाहिनी) आणि कृषी शीतगृह तयार केली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे यांचे जतन होणार असून त्याची वाहतूक करणेही सोपे होणार आहे.
वसईचा भाग हा हरित पट्टा म्हणून ओळखला जात आहे. या पट्टय़ात विविध प्रकारे फळे, भाजीपाला पिकवला जातो. वसई-विरार क्षेत्रात विविध प्रकारची पिके घेतली जात आहेत. भातशेतीबरोबरच पालेभाज्याही पिकवल्या जातात. पालक, दुधी, मेथी, वांगी, केळी, मुळा अशी विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्याशिवाय विविध प्रकारच्या फुलांचीही लागवड केली जाते. त्यामध्ये झेंडू, तगर, मोगरा, जास्वंद अशा विविध प्रकारे फुलांची लागवड केली जात आहे.
वसई परिसरात पिकवली जाणारी फुले व फळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जातात. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याच प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने अनेक पिकांची व फळबागांची नासधूस होत असते. कधी अतिवृष्टी, पूरस्थिती, रोगराई असे प्रकार जेव्हा घडतात, त्यावेळेस शेतकरी वर्गाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी ‘अॅग्रो अॅम्ब्युलन्स’ सेवा व शीतगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे.
या सेवेमार्फत कृषी उत्पादने खराब होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्यरीत्या माहिती मिळवण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या महासभेतही यावर चर्चा करण्यात आली आहे. शेतकरीवर्गालाही याचा चांगला फायदा मिळावा यासाठी अॅग्रो अॅम्ब्युलन्स आणि शेतमालाच्या संरक्षणासाठी शीतगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकरी वर्गालाही याचा चांगला फायदा मिळू शकेल. अनेक वेळा विविध कारणांमुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडत असतो, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. उत्पादन व उत्पन्नवाढीसही त्यामुळे मदत मिळू शकेल, असा विश्वास पालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.