कल्याण : पावसाळा तोंडावर आला तरी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नाले, गटार सफाईची कामे सुरू झाली नसल्याने जागोजागीचे नाले, गटारे कचरा, गाळाने तुडुंब भरले आहेत. नाले, गटारांमधील कचरा वेळीच काढला नाही तर शहर जलमय होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी मार्च, एप्रिलमध्ये नाले, गटार सफाईच्या कामांच्या निविदा काढून प्रशासनाकडून ठेकेदारांना कामाचे वाटप केले जाते. एप्रिल अखेरपासून नाले, गटार सफाईची कामे पालिकेकडून सुरू केली जातात. यावेळी नाले, खड्डे, चऱ्या भरण्याच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी स्पर्धक ठेकेदारांकडून झाल्या. काही ठराविक ठेकेदारांना स्पर्धा घडून न आणता झटपट कामे दिली, असे आरोप स्पर्धक काही ठेकेदारांनी केले. याप्रकरणी आयुक्तांकडे तक्रारी झाल्या. या तक्रारींची दखल घेऊन शहर अभियंता विभागाने नाले सफाई, खड्डे, चऱ्या भरणीच्या कामाच्या नव्याने निविदा काढल्या आहेत.
हेही वाचा… काटई गावात विवाहितेला कुटुंबीयांकडून बेदम मारहाण
यापूर्वीच्या निविदा प्रक्रियेत प्रशासनाची अडवणूक करणाऱ्या चार ठेकेदारांना पालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. यापू्र्वीच्या ठेकेदारांनी २९ ते ३० टक्के दराने निविदा भरणा केल्या. पालिकेने त्यांना अनामत रकमा भरण्यासाठी, चर्चेसाठी बोलविले. त्यावेळी त्यांनी प्रशासनाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. ठेकेदारांच्या या मनमानीमुळे नाले, गटार, खड्डे भरणीची कामे रखडली असल्याचा ठपका ठेवत शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी रिशी कन्स्ट्रक्शन, सुमीत राजेंद्र मुकादम, मे. भावेश भोईर, श्री गणेश ॲन्ड कंपनी यांना एक वर्षासाठी पालिकेत कामे करण्यास बंदी घातली. आता हेच नवीन निविदा प्रक्रियेत कमी दराने निविदा भरुन पुन्हा शिरकाव करतात का याकडे स्पर्धक ठेकेदारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा… ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; खोलीत अडकलेल्या पाचजणांची पालिकेच्या पथकाने केली सुटका
नाले सफाईची कामे वेळीच सुरू न झाल्याने डोंबिवली, कल्याणमधील नाले, गटारे जागोजागी कचऱ्याने भरली आहेत. पावसाळ्यापूर्वी गाळ, कचरा बाहेर काढला नाही तर पावसाचे पाणी गटार, नाल्याच्या बाहेर येऊन परिसर जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्षानुवर्ष ठेकेदार पाऊस सुरू होण्यापूर्वी नाले सफाईची कामे सुरू करतात. एकदा पाऊस सुरू झाला की ते उरलेले कामे अर्धवट टाकून पूर्ण कामे केल्याची देयके काढतात. नाले सफाई हा पालिकेतील एक मोठा घोटाळा असल्याचे जाणकार सांगतात. नाले, गटारांची थोडीफार सफाई करायची आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने पूर्ण कामे केल्याची देयके काढायची अशी मोठी साखळी पालिकेत सक्रिय आहे. त्याचा फटका पावसाळ्यात नागरिकांना शहर जलमय झाले की बसतो.
हेही वाचा… पाणी आटल्याने ठाकुर्ली येथील खंबाळापाडा तलावात मृत माशांचा खच, दुर्गंधीने रहिवासी हैराण
पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, नाले सफाईच्या कामाच्या नव्याने निविदा प्रक्रिया करुन त्या उघडल्या आहेत. लवकरच ठेकेदार नियुक्त करुन पाऊस सुरू होण्यापूर्वी सफाईची कामे सुरू केली जातील.