ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्ष आणि जागतिक महिला दिना निमित्त ठाण्यात शनिवारी महिलांसाठी खास “अहिल्या दौड” चे आयोजन करण्यात आले होते. या दौड मध्ये शेकडो ठाणेकर महिला सहभागी झाल्या होत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा केलेल्या मुली तसेच मशाल घेऊन संचालन करणारी शाळकरी मुले या दौड मध्ये पाहायला मिळाली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या वतीने ठाण्यात वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महिला दिनाचे औचित्य साधून ‘अहिल्या दौड’ काढण्यात आली. यावेळी शेकडो ठाणेकरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार केला.अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारात न्याय, प्रशासन आणि लोककल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी अनेक मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या, तसेच लोकांना रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक धोरणे आखली त्यांचे हे कार्य भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य, विचार जनसामान्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने “ अहिल्या दौड ” चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आज, शनिवार सकाळी ७ वाजता या दौडला सुरुवात झाली. समारोह समितीच्या अध्यक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे, उपाध्यक्ष दीपक कुरकुंडे, अहिल्यादेवींचे वंशज, समितीचे कार्यवाह प्रफुल्ल शिंदे, लेक सिटी स्पोर्ट्स क्लबचे प्रमोद वाघमोडे,आंतरराष्ट्रीय खेळाडू मॅरेथॉन पटू कुमारी अदिती राजेश पाटील आदिसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह ६०० पेक्षा जास्त महिला, शाळकरी मुली तसेच धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, राष्ट्रसेविका समिति ठाणे महानगर, महिला समन्वय समिति आदिसह विविध संस्थांचे पदाधिकारी या दौड मध्ये सहभागी झाले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा केलेल्या मुली, मशाल घेऊन संचालन करणारी शाळकरी मुले, मावळी मंडळ शाळेची राष्ट्रीय खेळाडू संस्कृती पारकर हिचे दांडपट्टा आणि सिलंबन प्रात्यक्षिक या दौडचे आकर्षण ठरले. मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथून सुरु झालेली ही दौड दगडी शाळा, गजानन महाराज मंदिर, तीन पेट्रोल पंप, घंटाळी, मासुंदा तलाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पुन्हा स्मारकाच्या येथे दौड समाप्त झाली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जनसामन्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या आहिल्या दौड मध्ये महिला व शाळकरी मुलींनी मोठा सहभाग देऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल समारोह समितीच्या अध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे यांनी उपस्थित सर्वांचे यावेळी आभार व्यक्त केले.

Story img Loader