लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दिलीप कपोते वाहनतळाच्या आवारात महिलांसाठी अत्याधुनिक पध्दतीचे वातानुकूलित प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. महिलांसाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा या प्रसाधनगृहात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिलांची सुरक्षितता, वैयक्तिक काळजी आणि प्रसाधनगृह स्वच्छता यास प्राधान्य देऊन या प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात आली आहे.

कल्याण शहर परिसरातून दररोज शेकडो महिला मुंबई, नाशिक परिसरात नोकरी, व्यवसायासाठी जातात. या महिलांना प्रवासातून आल्यावर अत्याधुनिक पध्दतीचे प्रसाधनगृह रेल्वे स्थानक भागात असावे म्हणून पालिका प्रशासनाने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात अत्याधुनिक पध्दतीचे वातानुकूलित प्रसाधनगृह उभारण्याचा निर्णय घेतला. पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेतून शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपअभियंता योगेश गोटेकर यांच्या विशेष प्रयत्नातून या प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-कल्याण डोंबिवली पालिकेतील ३६३६ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजेनेचा लाभ?

या प्रसाधनगृहाला ग्लोबल स्टार मानांकन प्राप्त आहे. या अत्याधुनिक प्रसाधनगृहात चार स्मार्ट स्वच्छतागृह, बालक काळजी कक्ष, कपडे बदलण्यासाठी कक्ष, सॅनिटरी पॅड वेन्डिंग मशिन, स्तनदा मातांसाठी कक्ष, फिडींग कक्षाचा समावेश आहे. महिला प्रवासातून आल्यानंतर काही महिलांजवळ लहान बाळ असतात. त्यांना प्रसाधनगृहात आल्यावर बाळ ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. बाळाला स्तनपान किंवा खाऊ भरवायचा असेल तर स्वतंत्र कक्ष याठिकाणी आहे. मनुष्यबळ न ठेवता इंटरनेट परिचालन पध्दतीने या प्रसाधनगृहाची स्वच्छता आणि देखभाल केली जाणार आहे.

कल्याण रेल्वे स्थानक भागात महिलांसाठी अद्ययावत, स्वच्छ प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत होती. या नवीन अत्याधुनिक प्रसाधनगृहामुळे महिलांची गैरसोय दूर झाली आहे. या स्वच्छतागृहात महिलांसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सौंदर्य प्रसाधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले. वुलू पावडर रूमच्या माध्यमातून या प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-भटक्या श्वानाच्या हल्ल्यात दोन अग्निशमन कर्मचारी जखमी

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील पहिले वातानुकूलित अत्याधुनिक पध्दतीचे महिलांसाठी स्मार्ट प्रसाधनगृह कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात उभारण्यात आले आहे. या प्रसाधनगृहात महिलांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंचलित पध्दतीने या प्रसाधनगृहाचे परिचालन होणार आहे. -रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air conditioned restroom for women in premises of dilip kapote parking lot in kalyan mrj