लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना यश येत नसल्याचे चित्र आहे. वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलींचे कठोर पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र शहरांतील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेले काही दिवस बदलापूर आणि उल्हासनगर शहरांतील हवा अतिवाईट स्तरावर नोंदली जात आहे, तर ठाण्यासह इतर शहरांतील हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील हवेचा स्तर खालावला होता. त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेत स्थानिक स्वराज्य संस्थांना हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही प्रमुख शहरांमधील प्रदूषणात घट झालेली नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवलेल्या आकडेवारीत हवा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट स्तरावर नोंदला गेला आहे. है. बदलापूर आणि उल्हासनगरमधील हवा आरोग्यास चांगली नसल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा-ठाणे : ‘घोडबंदर’वरील घाटरस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत
हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी उच्च न्यायालयाने पालिकांना मार्गदर्शक सूचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. यानुसार गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील महापालिकांकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु उपाययोजनांनंतरही जिल्ह्यातील शहरांमधील प्रदूषण फारसे कमी झालेले नसल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगर आणि बदलापूर शहरांतील हवेचा दर्जा वाईट असल्याचे दिसून आले.
हवा गुणवत्ता निर्देशांक
१ डिसेंबरला उल्हासनगरचा हवा गुणवत्ता निर्देशांक २४९ इतका, तर बदलापूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक २३६ होता. त्यानंतर ६ डिसेंबरला उल्हासनगरचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०१ इतका होता.
इतर शहरात हवा मध्यम प्रदूषित
उल्हासनगरच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट असल्याचे गेल्या आठवड्यापासून दिसून येत आहे. हीच स्थिती बदलापूरची आहे. या ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक २००च्या पुढेच असल्याचे दिसून येतो. त्या तुलनेत ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली शहरांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित असा नोंद होत आहे.
आणखी वाचा-NIA ची मोठी कारवाई; महाराष्ट्रात ४३ ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन?
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वातावरणातील धुलिकण नियंत्रणात आणण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांसह बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. बांधकामांच्या ठिकाणी घ्यावयाच्या काळजीबद्दलही रोज आढावा घेतला जात आहे. रस्ते धुण्याचे कामही सुरू असून त्याचा फायदा होत आहे. -योगेश गोडसे, मुख्याधिकारी, तुळगाव बदलापूर नगर परिषद
बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. रस्तेही धुण्यात आले असून शहरात आदेशापूर्वीच धुलिकण रोखण्यासाठी तुषार फवारणी यंत्रणा कार्यरत आहे. रस्तेही धुतले जात आहेत. शहरात काही विकासकामेही सुरू आहेत. त्यामुळे काही भागांत रस्ते खोदले आहेत. -जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर महानगर पालिका