किशोर कोकणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमधील हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी खासगी बांधकामांवर वेगवेगळे निर्बंध आणण्यात आले असताना ठाणे आणि पालघरमध्ये सरकारी प्रकल्पांच्या कामांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेची कामे सुरू आहेत. या भागातील मानपाडा ते वाघबीळपर्यंत संपूर्ण सेवा रस्त्यावर राडारोडा पडलेला आहे. मुंबई- नाशिक महामार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पामुळे धुळीचे साम्राज्य पसरत आहे. ठाणे महापालिकेच्या कामांच्या ठिकाणी वाळू, खडी उघड्यावर पडली आहे. तर, पालघर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुंबई – बडोदा द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वेचे डहाणू रोडपर्यंतचे चौपदरीकरण तसेच समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग या प्रकल्पांच्या ठिकाणी होणाऱ्या माती, मुरूमच्या भरावामुळे प्रकल्पाच्या जवळपासच्या भागामध्ये हवेचा दर्जा घसरला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबई, ठाण्यात महापालिकांकडून हवा प्रदूषणप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. ठाणे शहरात राज्य सरकारकडून विविध प्रकल्प सुरू आहेत. परंतु येथे होणाऱ्या प्रदूषणावर सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आले आहे. ठाणे शहरात घोडबंदर मार्गावर मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) खोदकाम केले आहे. परंतु या ठिकाणी मातीचे ढिगारे कित्येक दिवस पडून आहे.

हेही वाचा >>>फुसका बार वाजलाच नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

दुचाकीवरून प्रवास करताना डोळे, नाका-तोंडात धुळीचे कण जात असल्याचे प्रवासी चित्रा म्हस्के यांनी सांगितले. शिळफाटा येथेही अशीच अवस्था आहे. या भागात उड्डाणपूल निर्माणाचे काम केले जात आहे. येथील खडीवर काही ठिकाणी अच्छादन होते. परंतु कामाच्या ठिकाणी माती, खडी उघड्यावर होती.

मुंबई- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा महामार्ग मुंबई, ठाण्याहून भिवंडी, नाशिक, कल्याणच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु याठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळ े या मार्गावर वाहतूक करताना अनेक वाहन चालक मुखपट्टी वापरून प्रवास करत असतात.

पालघरमध्ये सुरू असणाऱ्या बडोदा महामार्ग, पश्चिम रेल्वेचे डहाणू रोडपर्यंतचे चौपदरीकरण तसेच समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग या प्रकल्पांच्या ठिकाणी होणाऱ्या माती, मुरुमांच्या भरावामुळे प्रकल्पाच्या भागामध्ये हवेचा दर्जा घसरला आहे. विशेष म्हणजे जिल्हा निर्मिती होऊन नऊ वर्षाच्या कालावधी उलटला असला तरी हवेचा दर्जा तपासणीची कार्यक्षम यंत्रणा कार्यरत नाही. बोईसर जवळ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हवेची तपासणी करणारे केंद्र असून त्यासह तारापूर येथील प्रदूषण नियंत्रण विभागाचे कार्यालय, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तसेच डहाणू येथील अदानी औष्णिक ऊर्जा प्रकल्प येथे हवेचा दर्जा मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. या केंद्रांमधील तपासणीमध्य परिसरातील हवेचा दर्जा चांगला असल्याचे दर्शविण्यात येत असले तरीही त्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होत नाही.

वसईविरारमध्येही बिकट परिस्थिती…

वसई विरार शहरात विकास कामे सुरू आहेत त्यात वर्सोवा पुलावरील मुंबई सुरत मार्गिकेचे काम, नायगाव पूर्वेतील जूचंद्र उड्डाणपूल, नारिंगी उड्डाणपूल, गोखीवरे येथील उड्डाणपूल अशा प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी साहित्याची वाहतूक सुरू असते. तर, दुसरीकडे काम सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे लावून एका बाजूने वाहनांना ये – जा करण्यास पर्यायी मार्ग दिले आहेत. मात्र, हे रस्ते योग्यरित्या न तयार केल्याने धुळीचे साम्राज्य आहे.

राज्य शासन खासगी बांधकामांवर कारवाई करत आहे. परंतु राज्य सरकारच्या अनेक प्रकल्पांमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. याठिकाणी हवा प्रदूषण रोखण्यासाठी आखलेल्या नियमांचे पालन करण्यात येत नाही. रोहीत जोशीपर्यावरणवादी कार्यकर्ते