ठाणे : ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार मध्यम पातळीवर नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी १४०, नवी मुंबई येथे १४०, बदलापूर येथे १६० हून अधिक निर्देशांक नोंदविण्यात आला. हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी या गुणवत्तेमुळे हृदयरोग, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसासंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. सरकारी अहवालानुसार जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम असली तर एक्यूआय डॉट इन या संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेच्या गुणवत्ता वाईट पातळीवर नोंदविण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता वाईट होऊन प्रदूषण वाढले आहे. ठाणे जिल्ह्यातही हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असल्याची नोंद एक्यूआय डाॅट इन या संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आले आहे. हिवाळ्यामध्ये हवेतील गारव्यामुळे धुलीकण तळामधील भागात तरंगत असतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊन प्रदूषण होत असते.

हेही वाचा >>> डोंबिवलीत व्हीव्हीपॅटमधील मते पुनर्मोजणीसाठी दीपेश म्हात्रे यांनी भरली चार लाखाची रक्कम

एक्यूआय डॉट इनच्या निर्देशांकानुसार, ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मागील आठवड्याभरापासून वाईट स्थितीत आहे. ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सरसरी ११२ ते ११८, भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता ही १०५ ते ११६ आणि कल्याण शहराची १०७ ते ११८ इतक्या सरासरी प्रमाणात आहे. तसेच नवी मुंबईतील ऐरोली शहराची गुणवत्ता ११० ते १२० इतक्या प्रमाणात आहे. हवेची गुणवत्ता सकाळच्या वेळेत अधिक वाईट असते. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणारे नागरिक, शाळकरी मुले किंवा चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवू शकतो.

तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी १४०, नवी मुंबई येथे १४०, बदलापूर येथे १६० हून अधिक निर्देशांक नोंदविण्यात आला. सरकारी निर्देशांकानुसार १०१ ते २०० ही पातळी मध्यम म्हणून नोंदविली जाते. असे असले तरी या निर्देशांकामुळे हृदयरोग, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसासंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> ठाणेकरांनो सावधान, आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती

एक्यूआय डॉट कॉम या संकेतस्थळाच्या निर्देशांकानुसार, ० ते ५० चांगली, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० वाईट आणि २०१ ते ३०० आरोग्यास धोकादायक, ३०१ ते ४०० गंभीर आणि ४०१ ते ५०० घातक अशा पातळीवर गणली जाते. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या संकेतस्थळानुसार, ० ते ५० चांगली, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० वाईट, ३०१ ते ४०० अतिशय वाईट आणि ४०१ पेक्षापुढे गंभीर या गुणवत्तेनुसार गणली जाते.

हिवाळ्यात हवेची गुणवत्ता वाईट होत असते. हवेतील धुलिकण तळाला असल्याने प्रदूषण होते. नागरिकांनी कचरा जाळणे कमी करावे, वाहनांमुळेही प्रदूषण होत असते. हवेची गुणवत्ता बिघडल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले, गरोदर महिला, वृद्धांना त्रास होऊ शकतो. – मोहसिन खान-पठाण, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, वातावरण संस्था.

ठाणे जिल्ह्यातील हवेच्या गुणवत्ता तपासली जात आहे. जिल्ह्याची हवा अद्याप वाईट गुणवत्तेत नाही. परंतु नागरिकांनी घराबाहेर पडताना मखपट्टीचा वापर करावा. – आनंद काटोळे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air quality index in thane district currently moderate zws